Jaykumar Gore Accident: साताऱ्यातील मान खटाव मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांच्या गाडीला साताऱ्यातील फलटण (Satara Phaltan) येथे अपघात झाला. बाणगंगा नदी पुलावरुन कार सुमारे 50  फूट खाली कोसळली. या अपघातात जयकुमार गोरे जखमी झाले आहेत. सध्या  पुणे येथील रुबी रुग्णालयात जयकुमार गोरेंवर उपचार सुरु आहेत आणि गोरे यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्या बरगड्या आणि पायाला बराच मार लागल्याची माहिती आहे. 


या अपघातानंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्वत: आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे यांनी हे सवाल उपस्थित केले आहेत. 'रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीचा अपघात कसा झाला?' असा सवाल उपस्थित करत भगवान गोरेंनी शंका उपस्थित केली आहे. 


तरीही जयकुमार गोरेंच्या गाडीचा अपघात झाला कसा?


ना कोणतीही रहदारी, ना धोकादायक वळण, ना गाडीमध्ये तांत्रिक बिघाड तरीही जयकुमार गोरेंचा अपघात झाला कसा? हाच प्रश्न आमदारांच्या वडिलांना पडला आहे. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जयकुमार गोरे हे पुण्याहून दहिवडीच्या दिशेने जात होते. फॉर्च्युनर कंपनीच्या गाडीमध्ये जयकुमार गोरे पुढे बसलेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीचा चालक स्वीय सहाय्यक आणि अंगरक्षक होते. पण फलटणच्या जवळ बाणगंगा नदीच्या पात्रामध्ये गाडी कोसळली. 
 
अपघातावेळी सव्वा तीन वाजले होते. आमदारांसह सगळेच जखमी झाले होते. पण स्थानिकांनी मदत केली आणि चौघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केलं. आमदार गोरेंना पुण्याला हलवलं अन् इतरांवरही उपचार सुरु झाले.


अपघाताभोवती संशयाचं धुकं


यानंतर खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह अनेकजण त्यांना भेटायलाही पोहोचले. अपघातानंतर खरं तर गाडीतल्या एअरबॅग्ज उघडणं अपेक्षित होतं. पण या अपघातात, त्या उघडल्याच गेल्या नाहीत.  त्यामुळेच या अपघाताभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं आहे. 


याआधी दिवंगत आमदार विनायक मेटेंच्या अपघातातही आणि सायरस मिस्त्रींच्या अपघातातही एअरबॅग्जचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी रात्री अपरात्री प्रवास करु नका असे सल्लेही अनेकांनी नेत्यांना दिले होते. सीट बेल्ट लावण्यावरुनही चर्चा झाली होती, पण त्यानंतरही आज असा अपघात झाला. सुदैव इतकंच की गोरे यांच्यासह सारे सुखरुप आहेत. 


ही बातमी देखील वाचा


भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, नदीच्या पुलावरुन गाडी 50 फूट खाली कोसळली