सातारा : नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या महिलेला कऱ्हाडातील (Karhad) प्रीतिसंगम घाटावर तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार (Rani Haar) सापडला होता. मात्र महिलेने तो हार सोनाराच्या माध्यमातून पोलिसांकडे (Police) सुपूर्द केला आहे. यामुळे महिलेच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, गोटे (ता. कन्हाड) येथील अधिकराव दिनकर पवार हे आपल्या कुटुंबासमवेत 7 सप्टेंबर रोजी हरतालिका मूर्ती विसर्जन करण्यासाठी कन्हाडातील प्रीतिसंगम घाटावर आले होते. कृष्णा नदीपात्रात हरितालिका मूर्तीचे विधिवत विसर्जन करत असताना त्यांच्याकडून चुकून 8 लाख 30 हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहारदेखील नदीपात्रात विसर्जित झाला होता. मात्र ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. 


तब्बल 10 तोळ्यांचा राणीहार केला परत


यानंतर चार दिवसांनी 11 सप्टेंबर रोजी शिवाजी स्टेडियमजवळ राहणाऱ्या नूरजहाँ फकीर या प्रीतिसंगम घाट परिसरात भंगार गोळा करत असताना त्यांना राणीहार आढळून आला. त्यानंतर नूरजहाँ यांनी तो ओळखीचे सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांच्याकडे आणून दिला. निसार सय्यद यांनी याची माहिती माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना दिली. त्यानंतर तिघेही कन्हाड शहर पोलीस ठाण्यात आले आणि हार जमा केला. पोलिसांनी अधिकराव पवार यांना बोलावून राणीहार त्यांच्याकडे दिला. 


महिलेच्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक 


दरम्यान, नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँ फकीर या महिलेला कऱ्हाडातील प्रीतिसंगम घाटावर दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार सापडला. लाखो रुपयांचा हा ऐवज सापडल्याने कुणाचीही नीतिमत्ता डगमगली असती मात्र भंगार गोळा करणाऱ्या महिलेने प्रामाणिकपणा दाखवला. या महिलेच्या प्रामाणिकपणाचे आता सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. 


दहा हजारांचे बक्षीस देऊन महिलेचा गौरव


नूरजहाँ फकीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना दहा हजार रुपये रोख व यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांना साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांचाही गौरव करण्यात आला.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Ladki Bahin Yojana: धक्कादायक! लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पठ्ठ्यानं बायकोचे भरले 26 फॉर्म, किती मिळाले पैसे?


मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?