सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (Shivajiraje Bhosale) यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

  


  शिवाजीराजे भोसले यांची साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख होती. त्यांनी सातारा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद देखील भूषवलं होतं. गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळामुळे ते राजकारणात सक्रिय नव्हते. 


 शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराजे भोसले यांनी अनेक वेळा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन केले होते. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद टोकाला गेले त्यावेळी राजघराण्यातील वैरत्व संपवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती असे बोललं जातं.  


श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दुःख व्यक्त केलंय. "श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे हे आमच्या कुटुंबातील जेष्ठ आणि आदर्श व्यक्ती होते. त्यांनी सातारा पालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही चांगले काम करून एक आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाय मी एका चांगल्या मार्गदर्शकाला मुकलो आहे. त्यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. आई भवानी त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना, अशा भावना शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केल्या आहेत. 


 श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म 23 एप्रिल 1947 रोजी साली झाला.साहित्य,कला,क्रीडा,सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत ते सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.


महत्वाच्या बातम्या


Prabha Atre :  एका अपघाताने मी संगीत क्षेत्राकडे वळले; डॉ. प्रभा अत्रे यांनी उलगडला त्यांचा सांगीतिक प्रवास 


Pitru Paksh 2022 : पितृपक्षात नारायण नागबली, कालसर्प पूजा विधी का करतात? त्र्यंबकेश्वरला भाविक वेटिंगवर