Pune Prabha Atre: डॉ. प्रभा अत्रे यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी नगर येथे स्थापन करण्यात आलेल्या किराणा घराणा ग्रंथालय व संसाधन केंद्राचे औपचारिक उद्घाटन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डॉ विकास कशाळकर यांनी केले. या ग्रंथालय आणि संसाधन केंद्रामुळे त्यांच्या कार्याचा प्रवास निरंतर पुढे सुरु राहणार आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या अनेक गोड आठवणींना उजाळा दिला आणि सांगीतिक जीवनाचा प्रवास उलगडला. 


माझ्या आयुष्यातील एका अपघातामुळे मी संगीत क्षेत्राकडे वळले. माझी आई कायम आजारी असायची. आईचा विरंगुळा म्हणून घरी पेटी शिकवायला शिक्षक  यायचे. आईने पेटी शिकण्याला नकार दिल्यामुळे वडिलांनी मला पेटी शिकण्यासाठी हट्ट केला. त्यानंतर मला संगीतात  रुचि वाढू लागली. कालांतराने मी अनेक स्पर्धेत भाग घेऊ लागले. त्यात मला ओळख मिळत होती. लोकांना आवडत होतं, अशा प्रकारे माझा संगीताचा प्रवास सुरु झाला, अशी आठवण त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे. 


व्यवसायाने मी गायिका असले, तरी विज्ञान आणि कायदा क्षेत्रातील पदवीधर असल्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे विज्ञान आणि तर्क यांच्या दृष्टीकोनातून पाहायची मला सवय झाली आहे. माझे आई, वडिल आणि गुरू मला उघड्या डोळ्याने परंपरेकडे बघ आणि काम कर, असे नेहमी सांगत. परंपरेवर माझी खूप श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. संगीत मुळात एक कला आहे, पण त्याला विज्ञानाची जोड आवश्यक आहे, असं मत अत्रे यांनी व्यक्त केले.


रियालिटी शोमध्ये प्रचंड प्रमाणात हुशार मुलं येतात. त्यांचा आत्मविश्वास, सादर करण्याची पद्धत वाखणण्याजोगी असते. मात्र त्यांची कला किती दिवस टिकते यावर मला शंका वाटते. कारण कला किंवा संगीत हे सातत्याने समोर येतं. उलगडत जातं. मात्र हे टॅलेन्ट शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करता येईल, याचा विचार करायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 


कोणत्याही क्षेत्रात काम करताना जे कालबाह्य झालंय, जे विकास रोखणारे आहे. विज्ञान युगात विकास सिद्ध करता आला पाहिजे. काळाबरोबर कला बदलत असते आणि कलेबरोबर तिचे शास्त्र ही बदलायला हवे. शास्राने पुढच्या विकासाची वाट दाखवायची असते. राग मल्हार गावून पाऊस पडत असतो किंवा दीपक राग गायल्याने दिवे लागतात, या कथांचा अर्थ एव्हढाच की, तुमचे सादरीकरण इतक्या वरच्या स्तराचे असले पाहिजे की पाऊस पडल्यासारखे, दिवे लागल्यासारखे वाटले पाहिजे, असं सांगत त्यांनी संगीताची ताकद सांगितली.


विज्ञान युगात अनेक गोष्टींना दूर ठेवले पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे स्वच्छ नजरेने पाहणे गरजेचे आहे. तरच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान मिळवू शकू. आज कलेचे जे प्रस्तुतीकरण होतंय , त्याने फक्त मनोरंजन होत आहे, आनंद सुद्धा होतोय. मात्र हे करताना सादरीकरणाचा स्तर कमी होणार नाही, याचे आपण भान ठेवले पाहिजे. टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक आहे, असंही त्या म्हणाल्या.