सातारा : प्रतापगडावरील (Satara Pratapgad ) अफझल खानाच्या कबरीजवळचं (Afzal Khan)   अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास प्रशासनानं काल सुरुवात केली. हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय. त्यावर आज सुनावणी होणार आहे.


अफझल खान स्मारक समितीच्यावतीने अॅड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली.  सरन्यायाधिशांच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आले.  कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडताना  स्मारकला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी असे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. परंतु खंडपीठाने गुरूवारी कोणताही आदेश आत्ता देण्याऐवजी या संदर्भात आम्ही सविस्तर शुक्रवारी सुनावणी करू असे म्हटले होते. त्यामुळे आज नेमकं काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


अफझल खानाची कबर 1659 साली बांधण्यात आल्याची माहिती  याचिकेत देण्यात आली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाचे देखील काही जुने निर्णय आहेत. कबरीजवळील जमीन ही वनखात्याची असल्याची माहिती आहे. त्यामुळे येथे अतिक्रमणाचा मुद्दा देखील येतो. आजच्या सुनावणीत नेमके काय आदेश दिले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


शिवप्रताप दिनाच्या दिवशी  अफजल खानाच्या कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर वनविभागाने  कारवाई केली आहे.  कबरीवरील अनधिकृत बांधकामा सर्वात आधी सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी  विरोध केला. 2001 ला चलो प्रतापगड अशी हाक देत त्यांनी आंदोलनही केलं होतं. ही कबर खरी वादात अनधिकृत बांधकामांमुळे आली. या कबर परिसरात पूर्वी काहीच नव्हतं पण कालांतराने इथे अनधिकृत बांधकामात वाढ झाली. 


कबरीवर झालेले अनधिकृत बांधकाम



  • कबरीच्या बाजूला  सात खोल्या

  • कबरीसमोर हॉल

  • मुजावरांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था

  • आठ  गुंठ्यात अनधिकृत बांधकाम


या अनधिकृत बांधकामावरुन अनेकदा वादही झाला आणि अखेर काल यावर हातोडा पडला. या कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. 


कबर परिसराला छावणीचं स्वरुप



  • परिसरात 144 कलम लागू

  • 1600 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात

  • 2006 पासून कबर पोलिसांच्या ताब्यात

  • पोलिसांच्या ताब्यात गेल्यापासून कबर बंद

  • प्रतापगडावर जाणारा रस्ता तोडक कारवाई होईपर्यंत बंद


शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.  10 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशीच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. शिवप्रेमींकडून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.  शिवभक्तांसाठी ही अभिनानाची गोष्ट आहे.  अफजल खानाच्या  कबरीसमोरील परिसर सील असल्याने कबरीबाबतचा खोटा इतिहास लोकांसमोर येत होता. आजच्या कारवाईनंतर हा इतिहास शिवप्रेमींसमोर येईल, अशी भावना शिवप्रेमींनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.