सातारा: शहरातील कैकाड गल्ली (Satara Kaikad Galli Prank News) सोमवारी भीतीने कमालीची हादरली. भीतीची एक अनामिक कळ कैकाड गल्लीतल्या प्रत्येकाच्या मनात उठली होती. अंधाऱ्या रात्री 11 वाजता विचारही करवत नाही असा प्रकार कैकाड गल्लीत घडला. जीवाचा थरकाप उडवणारा हा प्रकार नेमका काय होता ते पाहू
साताऱ्यातली कैकाड गल्लीच्या कोपऱ्यावरचं सार्वजनिक शौचालय, आणि त्या शौचालयात बसवलेला एक पुतळा. रात्री 11 वाजताच्या अंधाऱ्या रात्री हे असं काही तरी समोर आलं तर आपलं काय होईल याची कल्पनाही करवत नाही. साताऱ्याच्या कैकाड गल्लीतल्या दोन बायका शौचासाठी गेल्या आणि शौचालयातील तो पुतळा बघून त्यांच्या पोटातली कळ छातीत गेली.
शौचालयात ठेवण्यात आलेला तो पुतळा भयावह होता. बसलेल्या त्या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती आणि त्याच्या डोक्यावर पदरही होता. तसेच त्या पुतळ्याला मेक अप केलं होतं. त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा अधिक भयावह दिसत होता.
बायकांच्या किंकाळीने आख्खी गल्ली जागी
बायकांच्या किंकाळ्यांनी आख्खी कैकाड गल्ली जागी झाली आणि मग शौचालयात आलेल्या या अघोरी पाहुणीची चौकशी सुरु झाली. लोक जमले, मग त्याला दगड मारुन बघितलं. मग तो पुतळा पडला आणि त्याला बाहेर काढलं. म्हातारी कोतारी तर चळचळा कापत होतीच, पण पोरांच्या अंगात पण कापरं भरलं.
बरं या पुतळ्याला ठेवणाऱ्या कार्ट्यांनी पुतळ्याला नीट सजवलं होतं. म्हणजे मध्यरात्री कुणी त्या पुतळ्याला पाहिलं तर हार्टफेल कन्फर्म समजा. बरं त्याचा परिणाम इतका भयंकर झालाय की दोन तीन बायका तापानं फणफणतायत आणि बाकीच्या बायका आता त्या दिशेला फिरकतही नाहीत.
चेष्टा आणि प्रँक करावं पण त्याला काही मर्यादा असाव्यात, याचा परिणाम काय होईल हे तपासलं पाहिजे. किमान सार्वजनिक ठिकाणी तरी अशा प्रकारचे प्रँक करू नयेत असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.
पोलिसांचा तपास सुरू
आता पोलिसही असला अघोरी प्रँकवाल्यांच्या मागे लागले आहेत. इंटरनेटवरचे प्रँकवाले अघोरी व्हिडीओ पाहून, लोकांना घाबरवण्याचे उद्योग करणाऱ्यांना पोलिसांनी अशा ठिकाणी फटकवलं पाहिजे की रोज शौचालयात जाताना त्यांना त्या फटक्यांची आठवण आली पाहिजे.
ही बातमी वाचा: