पुणे : राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची (Baramati Lok Sabha Election) यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) या नदंन-भावजयांमध्ये लढतीची शक्यता आहे. अशात आता आणखी एका व्यक्तीची भावी खासदार म्हणून चर्चा सुरू झाली आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे (Ankita Patil) यांच्या नावाचे बॅनर्स आता झळकू लागले आहेत. 


राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी या आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या गडाला हादरा द्यायचा असेल तर तेवढाच तगडा उमेदवार दिला पाहिजे अशी वस्तुस्थिती आहे. याच कारणामुळे बारामतीमध्ये स्वतः अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदारकी लढवणार अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दिसत असल्याने त्या राजकारणात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. 


अंकिता पाटील यांचेही फ्लेक्स झळकले


एकीकडे नणंद-भावजया अशा लढतीची शक्यता वर्तवली जात आहे, तर आता दुसरीकडे इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांची भावी खासदार अशा आशयाचे फ्लेक्स झळकल्याचं दिसून येतंय. अंकिता पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे फ्लेक्स झळकले जात आहेत. अंकिता पाटलांच्या 'भावी खासदार' या फ्लेक्समुळे त्या लोकसभेची निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू आहे. 


अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. अंकिता पाटील या भाजपच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा आहेत. इंदापुरातील कॉलेजसमोर अंकिता पाटील यांचे भावी खासदार असा उल्लेख केलेला फ्लेक्स लावला आहे. हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


बारामतीची जागा अजित पवार गट लढवणार


पवार कुटुंबीयांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. त्या आधी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवत होते. आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही जागा आपला गट लढवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. 


राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार सामील आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचा खासदार आहे. त्यामुळे महायुतीतील ही जागा अजित पवारांनाच मिळणार हे स्पष्ट आहे. मग अंकिता पाटील लोकसभेची निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार असा प्रश्न विचारला जात आहे.


अंकिता पाटील या या आधी इंदापूरच्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या त्या राजकीय वारस असल्याची चर्चा आहे. आता येत्या काळात अंकिता पाटील या विधानसभा निवडणूक लढवणार की थेट लोकसभेची झेप घेणार हे येत्या काळात समजेल. 


ही बातमी वाचा: