Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात (Satara Rain Update) सुरु असलेल्या संततधार पावसाने कोयना धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात धरणात 6 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळत असल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कोयना धरणात 74 हजार 569 क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात गेल्या 24 तासांत सहा टीएमसीने वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात पश्चिमेला दमदार पावसाने हजेरी लावली असली, तरी पूर्वेकडे भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दुष्काळी पट्ट्यात अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाच तालुक्यातील महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शिवाजी विद्यापीठाकडूनही आजच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारपासून (Satara Rain Update) पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठा वाढत चालला आहे.
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने युद्धपातळीवर मोहीम राबवून दरड हटविली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. कराड-चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाटातही दरड कोसळली होती. महाबळेश्वर-तापोळा मार्गावरही दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला होता. जावळी, वाई तालुक्यांच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाटण तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे.
महाबळेश्वरला सर्वाधिक 331 मिलीमीटर पावसाची नोंद
गेल्या 24 तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक 331 मिलीमीटरची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये पाऊस दमदार पावसाने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही पावसाचा जोर दिसून आला. गुरुवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासात महाबळेश्वरला सर्वाधिक 331 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवजा 272 आणि कोयनेला 253 मिलीमीटर पाऊस पडला आहे. दुसरीकडे, वेण्णा तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या