Shivaji University Exam: कोल्हापूर जिल्ह्यासह (kolhapur News) राज्यात सर्वदूर गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी येऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून आज (20 जुलै) होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
परिपत्रक शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या जिल्हाधिकारी सातारा यांनी नैसर्गिक आपत्ती तथा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पारित केलेल्या आदेशास अनुसरुन शिवाजी विद्यापीठाच्या आज 20 जुलै 2023 रोजीच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. याबाबतचे सविस्तर परिपत्रक शिवाजी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावे. आजच्या परीक्षांचे सुधारित तारीख यथावकाश महाविद्यालयांना कळवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्रातील 580 परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे, तर 7 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
519 अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर
चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्रातील परीक्षा या 25 मे ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहेत. एकूण 676 अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. त्यातील 580 अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 40 परीक्षा सुरु असून 49 परीक्षा नियोजित आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळेत सुरु झाल्या असून, आतापर्यंत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. 519 अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. हे सर्व निकाल 1 ते 22 दिवसात जाहीर केले आहेत.
कोल्हापुरात पावसाने जोर धरला
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून दमदार पावसाने जोर धरला होता. पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे ओढे, नाल्यांसह ओहळ दुथडी वाहत आहेत. परिणामी जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे विविध पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या