Satara News : साताऱ्यातील (Satara) सज्जनगडावर (Sajjangad) मंगळवारी (20 सप्टेंबर) बिबट्याच्या बछड्याचे (Leopard Cub) दर्शन झालं. काल संध्याकाळच्या सुमारास सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही तरुणांना बिबट्याचा बछडा खेळताना दिसला. त्यांनी बिबट्याचे फोटो काढले. बिबट्याचा बछडा असल्याचं समजताच काही वेळात सज्जनगडावर गर्दी वाढली. त्यानंतर तात्काळ वनअधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.
खरंतर अनेकदा सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याचं सांगण्यात येत होतं. आता बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली आहे.
मध्यरात्री मादी बिबट्या आली आणि बछड्याला घेऊन गेली
सज्जनगडावर जाणाऱ्या मार्गावर भाविकांना एक बिबट्याचं पिल्लू एकटंच खेळताना आढळलं. परंतु जवळपास मादी बिबट्या दिसत नाही. भाविकांनी त्याचे फोटो काढले. बछडा दिसल्याची माहिती मिळताच वनअधिकारी आणि कर्मचारी इथे दाखल झाले. त्यांनी बिबट्यावर देखरेख ठेवली. बछडा इथे असल्याची जाणीव मादी बिबट्याला झाली. परंतु ती थेट इथे येऊन बिबट्याला घेऊन गेली नाही. कर्मचाऱ्यांनी बछड्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं. त्यानंतर मादी बिबट्या तिथे पोहोचली आणि बछड्याला घेऊन गेली. मध्यरात्रीच्या सुमारास एका आईचं आणि तिच्या पिल्लाची भेट झाली.
वनअधिकाऱ्यांकडून विशेष खबरदारी
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचा बछडा दिसला, परंतु मादी बिबट्या कुठेच दिसली नाही, त्यामुळे वनविभागाचे सहा ते आठ कर्मचारी सज्जनगड परिसरात तळ ठोकून होते. त्यानंतर मध्यरात्री मादी बिबट्या तिथे आली आणि बछड्याला घेऊन गेली. बिबट्याचा बछडा सज्जनगडावर असल्याचं कळल्यानंतर आम्ही तातडीने पथकासह त्या ठिकाणी पोहोचलो. बछडा घाबरुन जाऊ नये म्हणून अधिक खबरदारी घेतली होती. कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल फोनही सायलेंट मोडवर ठेवले होते. कर्मचारी त्याच्यावर नजर ठेवून होते. या बछड्याचं वय अंदाजे सहा महिने असं वाटतं, अशी प्रतिक्रिया वनअधिकाऱ्यांनी दिली. वनविभागाचे अधिकारी रात्रभर तिथे तळ ठोकून होते. शिवाय सकाळीही येऊन त्यांनी पाहणी केली. इथे येणाऱ्या भाविकांनी काळजी, खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
परळी खोऱ्यात वसलेला सज्जनगड
सज्जनगड ह्या किल्लाचे नाव घेताच श्री समर्थ रामदास स्वामी यांचं नाव मनात येतं. सज्जनगड हा निसर्गरम्य असा किल्ला परळी खोऱ्यात सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. सज्जनगड हा किल्ला सातारा जिल्ह्यामधील परळी खोऱ्यात येतो. अकराव्या शतकात शिलाहार राजा भोज याने या किल्ल्याची उभारणी केली. हा किल्ला आदिलशहाकडे होता, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. पुढे श्री समर्थ रामदास स्वामी या किल्ल्यावर वास्तव्यास आले आणि किल्लाचं नाव सज्जनगड रुढ झालं.