satara district gram panchayat election : साताऱ्यात 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल निकाल जाहीर करण्यात आले आहेत. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटांमध्येच ग्रामपंचायतींमध्ये लढत झाली. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या खेड ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून आमदार महेश शिंदे यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या खेड ग्रामपंचायतीवर 12-5 ने विजय मिळवला. आमदार शशिकांत शिंदे गटाला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले. 


जिल्ह्यातील इतर 5 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलला चिंचनेर, निंब आणि खिंडवाडी ग्रामपंचायतीवर सत्ता राखण्यात यश आले. महेश शिंदे यांना खेड आणि गोजेगाव ग्रामपंचायतीवर भगवा फडकवत 2 ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करता आली आहे. 


सातारचे उदयनराजे भोसले यांच्या गटाचे पॅनल संभाजी नगर ग्रामपंचायतीत निवडून आल्याने या ग्रामपंचायतीवर उदयनराजे गटाची सत्ता आली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला करिश्मा दाखवत उपळी ग्रामपंचायतीत 7 पैकी 4 जागा बिनविरोध केल्या होत्या. दोन जागांवर लागलेल्या निवडणुकीत त्यांच्याच विचारांचे उमेदवार विजयी झाले. या ग्रामपंचायतीत एका जागेवर ओबीसी आरक्षण असल्याने ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक झालेल्या सर्व जागांवर शिवेंद्रराजे यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाल्याने त्यांची सत्ता या ग्रामपंचायतीवर आली आहे.  


यावेळी सातारा तहसील कार्यालयात सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विजयी उमेदवारांनी सातारा शहरातून विजयी रॅली काडून गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.


इतर महत्वाच्या बातम्या