सातारा : जिल्ह्यातील (Satara News) कोरगाव तालुक्यातील तडवळे संमत कोरेगावमधील जवान विशाल सुभाष झांजुर्णे यांना सुट्टी संपवून कर्तव्यावर परतत असताना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या पस्तिशीत त्यांना वीरमरण आल्याने सातारा जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सैन्य दलात कार्यरत होते. त्यांचे पार्थिव मूळ गावी आले असून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन चिमुरडी मुलं, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. त्यांचे मोठे बंधूही सैन्यदलात कार्यरत आहेत. 


कर्तव्यावर परत जात असताना रेल्वेत तब्येत बिघडली 


विशाल हे आपल्या सुट्टीवर आले होते. सुट्टी संपवून तीन दिवसांपूर्वी कर्तव्यावर परत असताना रेल्वेमध्ये त्यांची तब्येत बिघडली. यानंतर त्यांना लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. विशाल छत्रपती संभाजीनगरमध्ये 267 बॉम्बे इंजीनिअरिंग रेजिमेंटमध्ये हवालदार कार्यरत होते. 


दोन मुलं पोरकी  


दरम्यान, विशाल यांना वीरमरण आल्याने त्यांची दोन चिमुरडी मुलं पोरकी झाली आहेत. हवालदार विशाल यांचे आई-वडील वृद्ध आहेत. त्यांची पत्नी आशा देवी गृहिणी आहेत. त्यांचा थोरला मुलगा आरव हा पहिलीमध्ये शिकत आहे, लहान मुलगा विहानचे नुकतेच बारसं झालं आहे. 


दीड दशकांच्या सेवेत अनेक मानसन्मान


विशाल यांनी 15 वर्षांच्या सैन्यदलातील सेवा कालावधीमध्ये श्रीनगर, लेह, लडाख, जम्मू काश्मीर आदी ठिकाणी देशसेवा बजावली. विशाल यांना उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. विशाल यांचे पार्थिव तडवळे संमत कोरेगाव येथे आणण्यात आलं आहे. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. 


इतर महत्वाच्या बातम्या