सातारा : जिल्ह्यातील (Satara News) खटाव तालुक्यातील पुसेसावळीत (Pusesawali) दोन गटामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता चार दिवसांनी जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. दहशतीखाली असणाऱ्या पुसेसावळीत जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्याचबरोबर बाजारपेठ पुन्हा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सण तोंडावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अजूनही गावामध्ये तळ ठोकला आहे. 


प्रशासनाच्या आवाहनानंतर संघटनांकडून आजचा मोर्चा रद्द  


दुसरीकडे, पुसेसावळीमध्ये (Pusesawali) झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आज मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासन आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने मोर्चा रद्द झाला. मोर्चाची हाक देण्यात आल्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, जितेंद्र हुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेत गणेशोत्सव तोंडावर असल्याने कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये, यासाठी मोर्चा काढू नका असं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत मोर्चा रद्द करण्यात आला.


पुसेसावळीत जनजीवन पुर्वपदावर आल्याने व्यापारपेठ सुद्धा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता रस्त्यांवर गर्दी दिसू लागली आहे. सणांच्या पार्श्‍वभूमीवर शांततेने साजरे करण्याचा निर्णय गावकऱ्यांकडून घेण्यात आला आहे. दुसरीकडे, काही व्यापाऱ्यांनी अजून दुकाने उघडलेली नाहीत. चार दिवसांनंतर महाविद्यालये व शाळा सुरू झाल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


पोलिसांचा तळ अजूनही गावात  


दरम्यान, पुढील काही सणवार असल्याने पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस पुसेसावळीत ठाण मांडून आहेत. पुसेसावळी मोठी बाजारपेठ असल्याने आजूबाजूंच्या गावांचा कायम संपर्क असतो. त्यामुळे पंचक्रोशीतील गावातून येणाऱ्यांची संख्या अजूनही तुरळक आहे. त्यामुळे व्यापारपेठेत ग्राहकांची वर्दळ तुरळक प्रमाणात आहे. येत्या काही दिवसात पुसेसावळी बाजारपेठ पूर्ववत होईल, अशी आशा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या