सातारा : साताऱ्यात (Satara News)  काही दिवसांपूर्वी शौचालयात भूत असल्याचे अफवाने गोंधळ उडाला होता. अखेर  साताऱ्यात महिला शौचालयात भुताची केलेली चेष्टा अंगलट आली आहे. अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्यासह दोन युवकांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या सुचनेनुसार सातारा पोलिसांनी केला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


साताऱ्यातील कैकाड गल्लीत असलेल्या सार्वजनिक शौचालयात  एक भयावह  पुतळा ठेवण्यात आला होता.बसवलेल्या त्या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती आणि त्याच्या डोक्यावर पदरही होता. तसेच त्या पुतळ्याला मेक अप केलं होतं. त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा अधिक भयावह दिसत होता.  रात्री 11 वाजताच्या अंधाऱ्या रात्री हे असं काही तरी समोर आलं तर आपलं काय होईल याची कल्पनाही करवत नाही. साताऱ्याच्या कैकाड गल्लीतल्या दोन बायका शौचासाठी गेल्या आणि शौचालयातील तो पुतळा बघून घाबरली. 


चेष्टा अंगलट आली


बायकांच्या किंकाळ्यांनी आख्खी कैकाड गल्ली जागी झाली आणि मग शौचालयात आलेल्या या अघोरी पाहुणीची चौकशी सुरु झाली. लोक जमले, मग त्याला दगड मारुन बघितलं. मग तो पुतळा पडला आणि त्याला बाहेर काढलं. चेष्टा आणि प्रँक करावं पण त्याला काही मर्यादा असाव्यात, याचा परिणाम काय होईल हे तपासलं पाहिजे. किमान सार्वजनिक ठिकाणी तरी अशा प्रकारचे प्रँक करू नयेत असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.


 इंटरनेटवरचे प्रँकवाले अघोरी व्हिडीओ पाहून, लोकांना घाबरवण्याचे उद्योग करणाऱ्यांना पोलिसांनी अशा ठिकाणी फटकवलं पाहिजे की रोज शौचालयात जाताना त्यांना त्या फटक्यांची आठवण आली पाहिजे. 


अटक टाळण्यासाठी चक्क पोलिसांवर सराईत गुंडाने सोडले कुत्रे


पुण्यातील (Pune) मुळशीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर चक्क पाळीव श्वान सोडण्यात आले. रविवारी (24 डिसेंबर) रोजी मुळशीतील रिहे गावात ही घटना घडली आहे. शेवटी पोलिसांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर संबंधित सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. मंगेश नामदेव पालवे (वय 32, रा. रिहे, ता. मुळशी)  असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, आरोपी मंगेश पालवे विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर तो बऱ्याच दिवस येरवडा कारागृहात होता. दरम्यान, त्याला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.