Satara Car Accident : सातारा (Satara) जिल्ह्यातील यवतेश्वर घाटात कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गायत्री आहेरराव (Gayatri Aherrao) वय 21 असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव होते. होंडा सिटी आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर धडक होवून हा अपघात झाला. दुर्दैवी बाब म्हणजे  काही गायत्रीचे वडील दिपक आहेरराव यांचेही अपघातामध्येच निधन झाले होते.  


सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्री हा भीषण अपघात (Accident) झाला. क्रेटा आणि होंडा सिटी कारची समोरासमोर धडक होवून चार ते पाचजण जखमी झाले. तर गायत्री आहेरराव या तरुणीचा मृत्यू झाला. अपघात जखमी झालेल्या सर्वांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी हलवले. 


 



मागील दीड वर्षापूर्वी गायत्री आहेरराव  ही सातारा नगरपालिकेत सेवेत रुजू झाली होती. मात्र, अचानक तिच्यावर काळानं घाला घातला आहे. दुर्देवी बाब म्हणजे सातारा नगरपालिकेचे कर्मचारी असलेले तिचे वडील दिपक आहेरराव हे देखील काही वर्षांपूर्वी अपघातामध्ये मृत पावले होते. वडिलांनंतर लेकीवरही काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


खासदार उदयनराजे भोसले यांची भावनिक पोस्ट


दरम्यान, या घटनेनंतर भाजप खासदार छत्रपती उदनयराजे भोसले यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी  गायत्री आहेररावला भावपूर्ण श्रद्धांजली अप्रण केली आहे. यामध्ये त्यांनी आमचे निकटवर्तीय मित्र कै. दीपक आहेरराव यांची सुकन्या कु. गायत्री दिपक आहेरराव हिचा काल दुर्देवी अपघातात मृत्यू झाला. हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्याचे म्हटलं आहे. भूतकाळातील अनेक घटना वेगाने तरळून गेल्या. आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत घनिष्ट ऋणानुबंध आहेत. कै दीपक यांचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते आणि आज परत हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबियांवर आला आहे. वहीनी श्रीमती ज्योती आहेरराव यांनी अतिशय कष्टांने आणि जिद्दीने सर्व अडचणींना सामोरे जाऊन मुलांची शिक्षण व सर्व गोष्टींची पूर्तता केली आज त्यांच्यासाठी काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाही आम्ही निशब्द असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. नुकतीच नगरपरिषदेच्या सेवेत गायत्री रुजू झाली होती, याचे समाधान होते. परंतू, हे समाधान अल्पकालावधीचे ठरले. तिच्या अचानक एक्झीटची सल मनात कायम टोचत राहील. आहेरराव कुटुंबाच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. कुटुंबियांना, मित्रपरिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. गायत्री च्या आत्म्यास चिरशांती लाभो अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 प्रवासी जखमी