Satara : सातारा जिल्ह्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या जावली तालूक्यातील सनपाने गावातील ओंकार मधुकर पवारने 194 वी रँक घेत जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. UPSC निकाल लागला तेव्हा ओंकार बाहेर होता. नुकताच तो आपल्या गावी परतला. गावी परतलेल्या ओंकारला पाहिल्यावर सनपाने गावाबरोबर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा अभिमानाने उर भरुन आला. कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडकवूनआपल्या गावाचे नाव संपूर्ण भारतात झळकवणाऱ्या ओंकारची सनपानेवासियांनी रथातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली. मिरवणूकीत संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले होते.
ओंकारचा सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार हरिष पाटणे यांनी ओंकार यांचे स्वागत केले. सर्वांनी तोंडभरुन कौतुक केले. गावातून अशी मिरवणूक म्हणजे गावकऱ्यांच्या माना उंचावल्या होत्या. यावेळी गावातील महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अनेकांनी ओंकार यांच्या स्वागतासाठी दारांपुढे सुंदर अशा रांगोळ्याही रेखाटल्या होत्या. अशा या जंगी स्वागताने ओंकार पुर्णपणे भारावून गेला होता. या यशाचे सर्व श्रेय ओंकारने त्याचे आई-वडिल आणि दोन बहिणींना दिले.
ओंकारच्या भोळ्या भाबड्या आईला अजून कळालचं नाही, पोरगं कलेक्टर झालं
लेकराचा असा जंगी सत्कार होत असताना ओंकारच्या भोळ्या भाबड्या आईला अजून कळालचं नाही, पोरगं कलेक्टर झालं आहे म्हणजे काय झालं आहे. तिला फक्त एवढच माहिती माझ्या पोराच्या मनासारख काहीतरी त्याला मिळाल आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सोडा, साध गाव पातळीवरची कार्यालये माहिती नसलेली कमी शिकलेली ओंकार पवारची आई लेकराच्या मिरवणुकीत सहभागी झाली होती. आयएएस ओंकार नुकताच गावाकड परतला तेव्हाचे हे दृष्य होते.
सातारा जिल्ह्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या जावली तालूक्यातील सनपाने गावातील ओंकार मधूकर पवार. आई निलमचे शिक्षण जेमतेम. वडिल त्यांच्या बहिणींच्या घरी राहून 15 वी पर्यंत शिकले आणि नंतर परिस्थितीमुळे गावाकडे परतून शेती करायला सुरवात केली. विहिरीचा तळ गाठला की, शेती थांबणार गाव. उन्हाळ्यात टँकरने गावाला प्यायला पाणी. आणि याच गावातील हे ओंकार पवार.
पाळण्यातच पोराचे पाय दिसतात तस गावापासून काही अंतरावर असलेल्या हुमगावातील शाळेत दहावीत ओंमकारने बाजी मारली. 92.15 टक्याने ओंकार पास झाला. शिक्षणासाठी घर सोडत कराड येथील शासकिय पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर आकुर्डी येथील डी. वाय. पाटीलमध्ये इंजिनिअरिंग करायला सुरवात केली. शेवटच्या वर्षात असताना डोक्यात कलेक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगले आणि कोरोना काळ सुरु झाला.
त्यामुळे ओंकारला गावी परतावे लागले. आजोबा 40 वर्ष माथाडी म्हणून गावाकडे परतलेले. थकलेल्या आजोबाला आणि वडिलांना शेतात मदत करता करता झाडाच्या सावलीत आभ्यासला आणखी ताकदीने सुरवात केली आणि टप्या टप्याने एक-एक करत पोस्ट निघत गेल्या आणि 194 रँक मिळवून युपीएसी क्रॅक केली. ही आनंदाची बातमी घरात सर्वांना सांगताच संपूर्ण कुटुंब भारावून गेले. मात्र, यावेळचा आईचा आनंद काही वेगळाच होता. त्याच कारण शिक्षण नसलेल्या आईला एवढच कळलं, की पोराला त्याच्या मनासारख काहीतरी मिळालं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या