सांगली : सांगलीत (Sangli) भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पदावरील महिला अधिकाऱ्याचा पहाटे जॉगिंगसाठी गेले असता आधी विनयभंग आणि नंतर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी आधी त्यांच्या दंडाला हात लावून ओढत "चलते का" ? म्हणाले. त्यानंतर झालेल्या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला. ज्यामध्ये गेडाम यांच्या हातावर किरकोळ जखम झाली आहे. हर्षलता गेडाम असे महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.


सांगलीमध्ये  जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या हर्षलता गेडाम गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडछाड करत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दंडाला हात लावून ओढत "चलते का"? असं विचारले. त्यानंतर हात लावणाऱ्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये गेडाम यांच्या हातावर किरकोळ जखम झाली. 


गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. सदरच्या अज्ञातापैकी एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेडखानी करण्याचा प्रकार केला होता अशी माहिती गेडाम यांनीच दिली. मात्र, त्यावेळी आपण दुर्लक्ष केलं होतं असे गेडाम म्हणाल्या. आज तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्याचा झालेला विनयभंग आणि झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या