Maharashtra News : कोरोना काळात निर्बंध असतानाही सहलीसाठी गेल्यामुळं चर्चेत आलेलं वाधवान कुटुंबाचा महाबळेश्वरमधील बंगला सील केला जाणार आहे. सीबीआयचे अधिकारी, पोलिसांच्या ताफ्यासह बंगल्यात दाखल झाले आहेत. वाधवान कुटुंबियांवर हजारो कोटींची अफरातफर आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. 


डीएचएफएल, वायइएस बँक यासारख्या असंख्य घोटाळ्यांशी निगडीत असलेल्या वाधवान कुटुंबाचा महाबळेश्वर येथील बंगला सील केला जाणार आहे. बंगला सील करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी महाबळेश्वरला पोहचले आहेत. त्यांच्या बंगल्याची सध्या झाडा झडती सुरु आहे. कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरी प्रकरणी वाधवान बंधुंवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कालपासून सीबीआयचे अधिकारी हे महाबळेश्वरात तळ ठोकून होते. त्यांनी आज दुपारी महाबळेश्वर पोलिसांच्या मदतीनं बंगल्याचा ताबा घेतला आणि सील करण्यासाठी बंगल्यात पोहोचले. 


कोरोना काळातील विशेष परवानगीमुळे चर्चेत आलेलं वाधवान कुटुंब 


महाबळेश्वरमधील याच बंगल्यात कोरोना काळात राहण्यासाठी गेल्यामुळं वाधवान कुटुंब चर्चेत आलं होतं. राज्यात संचारबंदी असताना वाधवान कुटुंबातील 23 लोक महाबळेश्वरला सहलीसाठी गेले होते. त्यांच्याकडे मंत्रालयाचं पत्र असल्यानं त्यांना प्रवासात कुणीच अडवलं नसल्याची माहिती आहे. महबळेश्वर प्रशासकीय यंत्रणेकडून तपासणी दरम्यान हे कुटुंब एका बंगल्यात सापडलं होतं. सर्व कुटुंबाला सातारा पोलिसांनी ताब्यात घेत पाचगणीतील रुग्णालयात दाखल केलं होतं. सर्वांवर 188 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते. 


याप्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली होती. ऐन कोरोनाच्या निर्बंधांमध्ये लॉकडाऊन असताना वाधवान कुटुंबियांनी साताऱ्याला सहलीसाठी जाण्याची परवानगी मिळालीच कशी? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल असं सांगितलं होतं. 


याप्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली होती. ऐन कोरोनाच्या निर्बंधांमध्ये लॉकडाऊन असताना वाधवान कुटुंबियांनी साताऱ्याला सहलीसाठी जाण्याची परवानगी मिळालीच कशी? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल असं सांगितलं होतं. विशेष म्हणजे, वाधवान कुटुंबीयांकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र असल्यानं त्यांना रस्त्यात कोणीच अडवलं नाही. या पत्रावर सर्व वाहनांचे क्रमांक आणि सदस्यांची माहिती होती. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून महाबळेश्वरमध्ये एका बंगल्यात आल्याची माहिती मिळाली होती. या सर्वांना पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.