Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दोन्ही गटांकडून प्रत्येकी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.


भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  


यामध्ये एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश केला आहे. बाकी शपथ घेतलेले महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यासाठी पहिली ठिणगी टाकणाऱ्या शंभूराज देसाई यांचे प्रमोशन झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांना गृहराज्यमंत्रीपद (ग्रामीण) दिले होते. तसेच त्यांच्याकडे वित्त, नियोजन आदी विविध खात्यांचा पदभार होता.


एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ 


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांसोबत पहिल्यांदा गुवाहाटीमध्ये दाखल झाले होते. इतकंच नव्हे, तर ज्या समर्थन आमदारांचे गुवाहाटीमधून राज्यपालांकडे पोहोचले होते. त्या पत्रावर पहिली सही सुद्धा त्यांचीच होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शंभूराज देसाई यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार हे निश्चित होते. 


एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप 


बंडखोर आमदारांनी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही टीका केली नव्हती, पण भाजपकडून उघडपणे बळ मिळू लागताच बंडखोरांना बारा हत्तीचे बळ आले. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरून त्यांनी गंभीर आरोप गुवाहाटीवरून परतल्यानंतर केले होते.


एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवण्याबाबत उद्धव ठाकरे नाही म्हणत असतानाही दोनवेळा चर्चा केल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी संरक्षण नाकारल्याचा आरोप केला होता. मात्र, माजी मंत्री सतेज पाटील यांनी शंभूराज देसाई यांनी केलेला दावा खोडून काढला होता. शंभूराज देसाई सलग तीनवेळा सातार जिल्ह्यातील पाटण मतदारसंघातून निवडून आले आहे. पाटण मतदारसंघात त्यांचा साखर कारखाना असून स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे. संसदपटू म्हणूनही शंभूराज देसाई यांच्याकडे पाहिले जाते.