Karad Janata Sahakari Bank Bogus Loan Case : पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बँक समजली जाणारी साताऱ्यातील (Satara) कराड जनता सहकारी बँक (Karad Janata Sahakari Bank) बोगस कर्ज प्रकरणात चांगलीच गुरफटत चालली आहे. या बँकेच्या संचालकांसह शासकीय अधिकाऱ्यांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एकूण 27 जणांचा समावेश आहे.


कोट्यवधी रुपयांची बोगस कर्ज दिल्याबाबत सध्या या बँकेची ईडीकडून (ED) चौकशी सुरु आहे. यात ज्या ज्या लोकांना मोठ्या रकमांचे कर्ज देण्यात आले आहे त्या त्या कर्जदारांची ईडी चौकशी करत आहे. हे सुरु असताना बँकेतीलच कर्मचाऱ्यांच्या नावे घेतलेल्या कर्ज प्रकरणाबाबत न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर, रात्री कराड पोलिसांनी बोगस कर्ज प्रकरणी 27 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात बँकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी तक्रार दिली आहे.  



गुन्हे दाखल झालेल्यांची नावे
कराड जनता बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी, संचालक विकास धुमाळ, राजीव शहा, सुरेश लाहोटी, दिलीप चव्हाण, आकाराम शिंगण, दिनकर पाटील, शंकरराव काटे, प्रकाश तवटे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, रमेश गायकवाड, डॉ परेश पाटील, संजय घोक्षे, राजेंद्र पाटोळे, प्रतिभा पाटील, ज्योती शहा, अनिल यादव, संजय जाधव, विजयकुमार डुबल, दीपक पाटणकर, बाजीराव पाटील, अरुण पाटील आणि भाऊसाहेब थोरात, अशा 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्या आरोपात गुन्ह्याची नोंद?
तत्कालीन संचालक मंडळातील या सगळ्यांवर बँकेतील 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर 2016 मध्ये सुमारे चार कोटी 52 लाख 87 हजाराचे कर्ज उचलून ही कर्ज 2017 मध्ये अस्तित्त्वात आणल्याचा आरोप आहे. ही कर्जाची रक्कम राजेश पाटील वाठारकर यांच्या नावे आणि त्यांच्या तीन मित्रांच्या नावे वर्ग करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. बँकेचे कर्मचारी राजेंद्र देसाई यांनी या प्रकाराबाबत न्यायालयात तक्रार केली होती. त्यानुसार आता न्यायालयाने या सर्व प्रकरणाची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिसांनी या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.