सातारा: महाबळेश्वरमध्ये सध्या ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू झाला आहे. तुफान वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना याचा मोठा फटका बसला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. 


आज सकाळपासूनच महाबळेश्वरमध्ये पावसाचं वातावरण दिसत होतं. त्यात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ढगफुटीसदृश्य असल्याचं दिसून येतंय. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. 


पुढील चार दिवसात राज्यात उष्णतेत मोठी घट


राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून पुढील चार दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार असून उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढील चार दिवस घट होणार आहे. पुढील चार दिवस राज्यभरतील तापमानात मोठी घट होणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी दिली आहे.


दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसात पुण्याचे तापमान 40 च्या वर जात आहे. पुण्यात एप्रिल किंवा मे महिन्यात 40 अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत. 40 अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये असे देखील आवाहन हवामान विभागाने केले आहे. 


कोल्हापुरात उष्णतेचा पारा 39 अंशावर 


कोल्हापूरसारख्या हिरव्यागार जिल्ह्यात उन्हाचा पारा 39 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. घरातून बाहेर पडणे म्हणजे शिक्षा असं समजलं जातं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात धुक्याची चादर पसरली होती. त्यानंतर चारच दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस झाला. मात्र आता कोल्हापूरचे तापमान 39 अंशांवर पोहचले आहे. नागरिकांना चक्कर येणे, धाप लागणे, डोकं दुखणे असे त्रास होऊ लागले आहेत. कामानिमित्त बाहेर येणारे अनेकजण गॉगल आणि कॅपचा वापर करत आहेत.


हिंगोलीत गारांसह पाऊस


हिंगोली जिल्ह्यातील आनेक भागात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. काही भागात तर गारांचा सुद्धा पाऊस झाला आहे. या पावसाने शेतातील पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतातील भाजीपालावर्गीय फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.