Amol Kolhe On BJP Offer : "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माझं कौतुक केलं हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांनी माझं कौतुक केलं म्हणून मी त्यांच्याकडे जावं असं नाही," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी स्पष्ट केलं. डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा (Shivputra Sambhaji) प्रयोग साताऱ्यात (Satara) होणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी साताऱ्यातील कराड इथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी महानाट्यासह राजकीय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं.
कौतुकाला संधी कसं मानायचं? : अमोल कोल्हे
अलिकडेच लोकसभेत तुम्ही केलेल्या एका भाषणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसमोर कौतुक केलं. तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीकडून काही ऑफर आहे का? आम्हाला राष्ट्रवादीचे खासदार म्हणून बघायला मिळणार की भाजपचे खासदार? असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. या प्रश्न ऐकल्यावर अमोल कोल्हे आधी हसले आणि मग आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "माननीय पंतप्रधानांनी कौतुक केलं ही आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही एका पेपरमध्ये काम करत असताना, तुमच्या बातमीचं दुसऱ्या पेपरच्या संपादकांनी कौतुक केलं तर मी तुम्हाला विचारायचं का की तुम्ही नोकरी सोडताय? कौतुकाला संधी कसं मानायचं? आधी ऑफर तर यायला हवी. सध्या ऑफर एकच आहे, 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य बघायला या, ते जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण, पद हे होतच असतं, ते फक्त पाच वर्ष असतं."
भाजपात प्रवेश करणार का? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले
दरम्यान याआधीही अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की, "माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अकारण घडवल्या जाता. जे लोक या चर्चा घडवतात त्यांना प्रश्न विचारणं संयुक्तिक ठरेल. संसदेच्या अधिवेशनात पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून मी जी भूमिका मांडतो, मी जे भाषण करतो ते जास्त बोलतं, कोणीतरी कोणाच्या तरी कानात सांगतं, त्या कानगोष्टींना उत्तर देण्यापेक्षा मी संसदेत जे बोलतो ती भूमिका जास्त अधिक मानली पाहिजे. मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून मी जी भूमिका मांडतो ती नजरेआड करुन जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा संशयाला जागा निर्माण होते की हे प्रश्न मुद्दाम विचारायला सांगतात का?"
हेही वाचा