सांगली : कोयना धरणातून (Koyna Dam)  सांगली जिल्ह्यासाठी (Sangli News) पाणी सोडण्याबाबतचा विषय पेटला आहे. कोयना धरणाच्या पाण्यावरून सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंवर (Shambhuraje Desai) जोरदार टीका केलीय. कोयना धरणातून सांगलीच्या हक्काचं पाणी न सोडण्यासाठी देसाईंचा दबाव असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केलाय. सांगली जिल्ह्याला वेठीला धरायचंय की जिल्ह्यातली भाजप संपवायचीय असा सवाल पाटील यांनी केलाय. शंभूराज देसाईंची फडणवीस, शाहांकडे तक्रार करणार असल्याचं पाटील म्हणाले. 


कृष्णा नदीचे या हंगामात असे कोरडेठाक चित्र अनेकवेळा पाहायला मिळाले. कारण एकतर यंदाचे कमी पाऊसमान  आणि दुसरीकडे कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात येणाऱ्या विसर्गाच्या बाबतीत केली जाणारी टाळाटाळ...यावरुन आता कोयनेचे पाणी कुणी ढवळले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण सांगली जिल्ह्याच्या  वाट्याचे पाणी कोयना धरणातून सोडण्यास होणारी टाळाटाळ पाहून खासदार संजयकाका पाटील यांनी आक्रमक होत थेट शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर टीका केलीय. कोयना मधून सांगली जिल्ह्याला पाणी न सोडून जिल्ह्याला वेठीस धरायचेय की जिल्ह्यातील भाजप पक्ष संपवायचीय हा प्रश्न उपस्थित होतोय असे  खासदार पाटील म्हणाले. त्यामुळे आता सांगली जिल्ह्याला सोडण्यात येणाऱ्या कोयनेच्या पाण्यावरून  महायुतीत जुंपल्याचे चित्र आहे.


कालवा सल्लागार समितीची बैठक


कोयनेतून सांगलीसाठी पाणी सोडले जात नसल्याने आणि कृष्णा नदी कोरडी पडत असल्याने 29 ऑक्टोबर रोजी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक देखील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली होती . या बैठकीत  तीन ठराव घेण्यात आले. 



  • कोयना धरणातून वीज निर्मीतीसाठी राखीव 35 टीएमसी पैकी 12 टीएमसी पाणी सिंचन व बिगर सिंचनसाठी घेणे

  • कोयना प्रकल्पातून प्रकल्प अहवालानुसार सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा निर्णय मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व जिल्हाधिकारी, सांगली व सातारा यांनी घ्यावा

  • जत तालुक्यातील वगळलेल्या गावांचा व सोलापूर जिल्ह्यातील वगळलेल्या तालुक्यांचा ट्रिगर-2 मध्ये समावेश करावा.


   मात्र या ठरावावर देखील सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सही देखील केली नाही.तिथूनच शंभूराजे देसाई यांच्या विरोधात रोष वाढायला लागला. यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांनी देखील रोष व्यक्त केला आहे.



  • कोयना धरणातील आजचा पाणी साठा- 85 टीएमसी

  • कोयना धरणातून टेंभू,ताकारी, म्हैसाळ योजनेसाठी 37. 53 टीएमसी पाणी दरवर्षी सोडण्याची तरतूद आहे 

  • यावर्षी 15/10/23 पासून आतापर्यंत 2 टीएमसी पाणी सांगलीला  सोडण्यात आले.


यंदा सांगली जिल्ह्यात भीषण दुष्काळची चिन्हे जाणवू लागलेत. त्यातच प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊन कोयनेतून सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात येणारे पाणी यंदा मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे  ते बऱ्याच वेळा सोडण्यात न आल्याचा आरोप होत आहे. यामुळे सांगलीच्या वाट्याचे  कोयनेतील पाणी राजकरण्यांनी ढवळले असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाला आहे.