Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही. महाराष्ट्रचे गणित आणि महाराष्ट्राच वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमसोबत नाटक करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. काँग्रेसचे सैनिक म्हणून सक्षमरीत्या ईव्हीएमच्या बाजूला उभे राहू आणि ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यासाठी येणाऱ्याला आलेल्या रस्त्याने परत जा असे ठणकावून सांगू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. सांगली जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांतून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रणिती शिंदे नियुक्ती झाली आहे. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजातील सर्व घटकापर्यंत न्यायची जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने केली पाहिजे. आगामी निवडणुकीत गट-तट, आणि हेवे-दावे बाजूला सारून एकत्रितपणे लढत पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून देण्याचे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले.
मुलाखतीचा पक्षश्रेष्ठींना गोपनीय अहवाल देणार
सांगली व सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोलापूरच्या प्रणिती शिंदे यांच्याकडे आहे. या सर्व मुलाखतीचा पक्षश्रेष्ठींना गोपनीय अहवाल देणार आहेत.सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी, इस्लामपूर, शिराळा या आठ मतदारसंघांतून इच्छुक उमेदवारांकडून पक्षाने अर्ज मागविले होते. यामध्ये तासगाव-कवठेमहांकाळ व खानापूर-आटपाडी मतदारसंघ वगळता इतर सहा मतदारसंघांतून 11 इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती प्रणिती यांच्याकडून घेण्यात आल्या.
सगळ्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात जोरदार चुरस आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मुलाखतीकडे अनेकाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, आमदार विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. या जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती विश्वजीत कदम घेणार आहेत. प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, सगळ्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे, त्यामुळे जसे लोकसभेत आपण काम केले तसे विधानसभा निवडणुकीत देखील काम करू. सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून गेली काही वर्षातील पराभवाचे मळभ दूर सारत नव्या उमेदीने आणि ऊर्जेने आपला गड आपल्याला परत मिळवायचा आहे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी संवाद साधत वाटचाल करणे गरजेचे आहे असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंहदादा सावंत, श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या