Sangli Newsभर उन्हात सलग तिसऱ्या दिवशी वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे (Warna dam victims and Chandoli sanctuary project victims) आंदोलन सुरुच आहे.  प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही त्वेषाने कायम ठेवले आहे. सरकारकडून आता तारीख पे तारीख न घेता निर्णय घेऊनच उठायचे असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. आज, दुपारी भर रस्त्यावरच या आंदोलकांनी आपली पंगत टाकत जेवण उरकून घेतले. दरम्यान, कचेरी परिसरात दंगल नियंत्रण करण्याच्या उपाय योजनांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


दोन दिवसांपासून धरण व प्रकल्पग्रस्तांनी (Warna dam victims and Chandoli sanctuary project victims) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी वाटाघाटी फिस्कटल्यावर आंदोलनाला सुरुवात झाली. काल, दुसऱ्या दिवशी थेट चाल करत गनिमी काव्याने आंदोलकांनी तहसील कचेरीत घुसून एका मजल्याचा ताबा घेतला. आंदोलनात महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागत आहे.


दरम्यान, वृद्ध महिलेला वाचविताना पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण किरकोळ जखमी झाले. आज, बुधवारी तिसऱ्या दिवशी पुन्हा आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यामुळे या परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आलेत. एक वाजता भर उन्हात आंदोलकांनी आपली जेवणे उरकून घेत पुन्हा नव्या दमाने आग ओकणाऱ्या सूर्याला अंगावर घेत आपल्या मागण्यांची बरसात कायम ठेवली.


तहसील कार्यालयात घुसून प्रशासन, शासनाच्या विरोधात घोषणाबाजी


इस्लामपूरमध्ये तहसील कार्यालयासमोर बसलेल्या वारणा धरणग्रस्त आणि चांदोली प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी दिवसभराच्या आंदोलनानंतर काल तहसील कार्यालयात घुसून प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी आंदोलनाला सुरुवात करताना महिलांनी संघर्ष गाणी गात वातावरण तापवले. यातच उन्हाचा चटका तीव्र होऊ लागल्याने प्रशासन लक्ष देत नाही, तर आत घुसण्याचा गनिमी कावा यशस्वी करत तहसील कार्यालयातील तळ मजल्यावर ठिय्या मारत ताबा घेतला. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. आंदोलकांच्या गर्दीने तळमजला पूर्ण भरून गेला होता. 


गेल्या 40 वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी 161 मोर्चे काढून प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश सुरु आहे. कब्जेपट्टीच्या नोटीसा मागे घ्याव्यात यासह इतर मागण्यासाठी धरणग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. काल, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे नेते सम्राट महाडिक, विक्रम पाटील,संतोष घनवट यांनी आंदोलस्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला. 


इतर महत्वाच्या बातम्या