Sangli Crime : सांगली जिल्ह्यामध्ये दरोडे (Robbery) टाकणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सांगली पोलिसांनी (Sangli Police) या टोळीतील तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचे दागिने आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल उर्फ अन्या युवराज पिंपळे (वय 49 वर्षे), तुकाराम भिमराव घोरवडे (वय 54 वर्षे) आणि दाजी धनराज सोळंके (वय 36 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


टोळीतील पाच जण मध्य प्रदेशातील


सांगली शहरामध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या दरोड्याचा छडा अखेर सांगली पोलिसांनी लावला आहे. मोठ्या शिताफीने दरोड्यातील तीन आरोपींना अटक करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून दरोड्यातील मुद्देमाल आणि रोकड असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेली तीन आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील असून त्यांचे इतर पाच साथीदार मध्य प्रदेशमधील असल्याचं समोर आलं आहे. लवकरच या आरोपींनाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी व्यक्त केला आहे. आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समजतं.


टोळीवर महाराष्ट्रसह, छत्तीसगड मध्य प्रदेश आणि ओडिसामध्येही गुन्हा


शहरातील कर्नाळ रोडवर असणाऱ्या एका घरावर पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून, हात पाय बांधून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचा गतीने तपास करत अखेर या दरोड्याचा आणि दरोडेखोरांच्या टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीवर महाराष्ट्रसह, छत्तीसगड मध्य प्रदेश आणि ओडिसा या राज्यात गुन्हे दाखल असल्याचं देखील समोर आलं आहे.


घरातील लोकांचे हातपाय बांधून दागिने लंपास


सांगली शहरातील कर्नाळ रोड इथल्या दत्तनगरमध्ये 23 डिसेंबर 2022 रोजी आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी करण्यात आली होती. यामध्ये बंगल्याचे मालक आशिष चिंचवाडे यांचे हातपाय बांधून त्यांच्या आईच्या गळ्यातील सव्वा आठ तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटामधील 100 ग्रॅम चांदी आणि दोन लाखांची रोकड असा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला होता. मध्यरात्री तीनच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला होता. दरोडेखोरांनी स्टीलचा रॉड आणि लोखंडी कटरसह हत्यारांनी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दागिने लुटले होते. 


हेही वाचा


Sangli Crime: कवलापूर ग्रामपंचायतीजवळ एक कोटीचे सोने जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई