Sangli Bajar Samiti Election : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) तासगाव आणि आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज (30 एप्रिल) मतदान सुरु झाले आहे. सायंकाळी चारपर्यंत मतदान प्रकिया पूर्ण करुन लगेचच या दोन बाजार समितीची आजच मतमोजणी देखील होणार आहे. यामुळे आजच तासगाव आणि आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. तासगाव बाजार समितीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. या ठिकाणी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत गेला आहे आणि भाजप खासदार संजयकाका पाटील विरुद्ध स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या गटामध्ये या ठिकाणी निवडणूक होत आहे. खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील, सुरेश पाटील आणि रोहित पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे. 


आटपाडी बाजार समितीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित पॅनल उभे केले आहेत. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अनिल बाबर समर्थक तानाजी पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. दरम्यान काल (29 एप्रिल) सांगली, इस्लामपूर, विटा या तीन बाजार समित्यांची मतमोजणी पार पडली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची वज्रमूठमुळे सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूरची बाजार समिती आपल्याकडे पुन्हा राखण्यात यश मिळवले. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने बाजी मारली. 


तासगाव बाजार समिती


तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही खासकरून वर्षभर चालणाऱ्या बेदाणा सौद्यासाठी प्रसिद्ध असून 1 हजार कोटींच्या आसपास बाजार समितीची वार्षिक उलाढाल आहे. या निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. 


आटपाडी बाजार समिती


आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती ही डाळिंब सौदे आणि शेळ्या-मेंढ्याच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. 150 कोटींच्या आसपास बाजार समितीची वार्षिक उलाढाल आहे. 


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ऐक्याने दणदणीत विजय


दरम्यान, सांगली बाजार समितीवर महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागांवर विजय मिळवला. एका ठिकाणी अपक्ष विजयी झाला. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ऐक्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनेलला मोठा विजय मिळाला. या निवडणुकीत भाजप मंत्री पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील यांना मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला


इतर महत्वाच्या बातम्या