सांगली : सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नाराजीनाट्यावर अखेर पडडा पडला आहे. सांगली लोकसभेचे मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उतरल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते, आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे सर्वजण चंद्रहार पाटील यांच्यासोबत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात आज (28 एप्रिल) प्रचारात उतरले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या रस्सीखेचानंतर मविआचा धर्म पाळत मविआच्या उमेदवाराचा आता प्रचार सुरू केला. त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता रंगत आली आहे.
आज पलूस कडेगाव मतदारसंघांमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते तसेच गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकतीने प्रयत्न करणारे आमदार विश्वजित कदम एकत्र आले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी आता महाविकास आघाडीचे मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गावोगावी भेटी देणं हाच प्राधान्य क्रम आहे. उन्हाची तीव्रता पाहता उमेदवारांकडून भेटीगाठींवर भर सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, या चंद्रहार पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या ते राजकारणामध्ये उतरले आहेत.
विश्वजित कदम तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
सांगली लोकसभेला होत असलेल्या तिरंगी लढतीवर बोलताना कदम यांनी सांगितले की, पूर्वीच्या दोन्ही उमेदवारांबाबत काहीतरी विषय आहेत. मात्र, हा नवखा उमेदवार आहे, त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येणारा काळ ठरवेल. जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत असल्याचे कदम यांनी सांगितले.
जनतेनं ही निवडणूक हाती घेतली : चंद्रहार पाटील
प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगितले की, प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते ताकतीने उतरले आहेत. आज पलूस पडेगाव मतदारसंघांमध्ये प्रचाराची सुरुवात केली आहे. जनतेनं ही निवडणूक हाती घेतली असून आम्हाला शंभर टक्के विजयाची खात्री असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या