सांगली : माझ्यावर कारवाईची सही करताना आमच्या कुटुंबाएवढं योगदान त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये दिलं आहे का? याचा विचार करावा आणि मगच माझ्यावर खुशाल कारवाई करावी, असं प्रतिआव्हान काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी काँग्रेसला दिले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटलांवर कारवाईचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला आहे आणि पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगलीमधील मेळाव्यात बोलले होते.


या पार्श्वभूमीवर विशाल पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाला वाढवण्यामध्ये वसंतदादा पाटील आणि कुटुंबाचं मोठं योगदान आहे. काँग्रेस पक्षाचा कोणताही लेखी आदेश आपल्याला आला नव्हता. त्यामुळे आपण कोणताही आदेश भंग केला नाही, त्याबरोबर आपण काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असून काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आपल्यावर कारवाई होणार नसल्याचा, विश्वास देखील विशाल पाटील यांनी व्यक्त केला.


भाजपच्या 4 नगरसेवकांचा राजीनामा देत विशाल पाटलांना पाठिंबा 


दरम्यान, सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. विशाल पाटील यांच्या बंडखोरीने संजय पाटील यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाचत विशाल पाटील यांनी भाजपला धक्का दिला असून मिरजमधील भाजप नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांचा प्रचार सुरू केला आहे. यापूर्वी दोन भाजप माजी आमदारांनी सुद्धा पक्षाला सोडचिट्टी देत विशाल पाटील यांच्या प्रचारात आहेत. 


भाजपचे नगरसेवक संदीप आवटे, निरंजन आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे विशाल पाटलांना बळ मिळालं आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत विशाल पाटलांना साथ देण्याची भूमिका काही भाजप नगरसेवकांनी घेतली होती. भाजप शहर जिल्हाध्यक्षांकडून बंडखोर चार नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. परंतु त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या