सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या (21 मार्च) सांगली दौरा होत आहे. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे सांगली लोकसभेवरून सुरू असलेल्या राजकीय कलगीतुरा थांबवणार की चंद्रहार पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा करून काँग्रेसला धक्का देणार? याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब करणार?
उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने उद्या सांगलीतील मिरजेमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी शिवसेना ठाकरें गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तब्बल 50 हजार शिवसैनिकांना बसता येईल, अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेतून उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब करणारक का? याकडे लक्ष असेल. या सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत तसेच ठाकरे गटातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही
चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेसने सांगलीच्या जागेवर दावा करतानाच ही जागा आपलीच असल्याचे म्हटलं आहे. दुसरीकडे कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडून काँग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेत काँग्रेसने या जागेवर लोकसभा मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून ते स्थानिक आमदारही माजी उपमुख्यमंत्री विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. त्यामुळे उद्याच्या सभेकडे सर्वाधिक लक्ष उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे असणार आहे. ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास सांगलीची लढत थेट चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे तिसऱ्यांदा रिंगणात असलेल्या संजय पाटील अशा दोन पाटलांमध्ये असेल.
इतर महत्वाच्या बातम्या