Vaishnavi Hagawane death : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात(Vaishnavi Hagawane death) एक महत्वाची अपडेट समोर आली आली आहे. कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाणच्या (Nilesh Chavan) विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते.
20 मे दिवशी नेमकं काय घडलं?
दरम्यान, 20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. यावेळी निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून तिथून हुसकाऊन लावले होते. कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. त्यानंतर वैष्णवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दिली होती. मात्र, पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक आणि वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे.
नेमकं प्रकरण काय?
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.
वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.
महत्वाच्या बातम्या:
