सांगली : महाविकास आघाडीमध्ये (Maha Viksas Adhadi) सांगलीच्या (Sangli Loksabha) जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसने (Congress) एकाच वेळी दावा केल्याने ही जागा आता नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार? याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचा उद्या (21 मार्च) सांगली दौरा होत आहे. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच ठाकरे यांनी घेतलेल्या एका निर्णयाने दोन्ही पक्षामधील वाद निवळणार का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे.  

Continues below advertisement

उद्धव ठाकरे वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेणार

उद्धव ठाकरे उद्या सांगलीत आगमन झाल्यानंतर प्रथम माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिस्थळी जाऊन वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी आज सांगलीमध्ये बोलताना पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून दोन्ही पक्षामध्ये सुरू असलेला राजकीय वाद निवळणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Continues below advertisement

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी

शिवसेना ठाकरे गटाकडू सांगलीच्या जागेवर दावा करण्यात आला असून या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काँग्रेसमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जागेवर आक्रमक भूमिका घेत कोणत्याच मित्रपक्षाने हक्क सांगू नये, यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय? अशी सुद्धा शंका येऊ लागली आहे. 

काँग्रेसकडून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील इच्छुक

दुसरीकडे, सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील इच्छुक आहेत. त्यांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाने सुद्धा उमेदवारी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर वसंतदादांच्या समाधीस्थळी ठाकरे यांचे जाणं हे राजकीयदृष्ट्या कैकपटीने महत्त्वाचं मानलं जात आहे. त्या निमित्ताने दोन्ही पक्षांमधील कटूता कमी होईल, असे बोलले जात आहे. 

उद्धव ठाकरेंची मिरजेत भव्य सभा

उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा उद्या मिरजेमध्ये होत असून सायंकाळी 5:30 च्या सुमारास भव्य सभा होणार आहे. सभेला पोहोचण्यापूर्वी ते पहिल्यांदा वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. उद्धव ठाकरे यांचं उद्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर विमानतळावर दुपारी तीन वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर ते राजवाड्यावरती जाऊन कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेणार आहेत. शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवार आहेत. हा मतदारसंघ सुद्धा ठाकरे यांच्या वाट्याला होता. मात्र, काँग्रेसने ही जागा पदरात पाडून घेतली आहे. त्यामुळे उद्याच्या उद्धव ठाकरेंच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या