सांगली : सोन्याचे भाव (Gold Rate) गगनाला भिडले असताना सोनं खरेदी करणं सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर गेलं आहे. पण त्याची सोन्याच्या वस्तराने (Gold Razor) दाढी व्हावी आणि त्यांना आनंद मिळावा या हेतूने सोन्याच्या वस्तराने त्याची दाढी केली जात आहे. सांगलीच्या शिराळ्यातील नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंनी हा अनोखा उपक्रम केला आहे. ग्रामीण भागात हा आठ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकाची रीघ लागली आहे.


आठ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा


शिराळा तालुक्यातील रिळे या ग्रामीण भागातील नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडीलोपार्जित केसकर्तनालयाचे दुकान गेली अनेक दशके सुरू आहे. त्याची दोन मुले अमोल आणि प्रदीप यांनी वातानुकूलित दुकान केले आणि चक्क जवळपास आठ तोळे वजनाचा वस्तारा बनवून घेतला असून त्याद्वारे फक्त शंभर रुपयात दाढी आणि केस कापत आहेत. त्यांच्या वडिलांनी सर्व आयुष्य या व्यवसायासाठी त्यांनी समर्पित केले आहे.  


सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी ग्राहकांची रिघ


कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच! अशोक देसाई यांनी पत्नीची साथ होती आणि त्यानंतर थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप ही दोन मुलेही नाभिक व्यवसायाकडे वळले. जेमतेम शिक्षण असणारा थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप गेल्या पंधरा-वीस वर्षापासून नाभिक व्यवसायात कार्यरत आहेत. प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवा यामुळे तालुक्यातील ग्राहकांचा या दुकानात ओढा आहे. माफक दरामध्ये सेवा देण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे. या व्यवसायाबरोबर  सामाजिक कामामध्ये ही सहभाग असतो. 


सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी


एकीकडे सोन्याच्या भावाने गगनभरारी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना ते आवाक्याच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोने घेता येत नाही निदान सोन्याच्या वस्तराने त्यांची दाढी करावी हा मानस मणी बाळगून गेल्या काही वर्षापासून व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून एखादा सोन्याचा दागिना बनवायचा मानस या दोघा भावांनी आई-वडिलांना बोलून दाखविला होता. आई-वडीलांनीही याला मान्यता दिली होती. 


साडेपाच लाख रुपये किमतीचा वस्तरा


दोघा भावांनी व्यवसाय करता-करता बचत करून मिळणाऱ्या पैशातून एक बचत संचयनी सुरू केली. दहा-पंधरा वर्षाच्या व्यवसायातून  त्यांनी चक्क आठ तोळ्याचा जवळपास साडेपाच लाखांचा दाढी करण्याचा सोन्याचा वस्तारा बनविला. हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्यासाठी परिसरातील लोकांची दुकानात रीघ लागली आहे. अनेक ग्राहक वेटिंगमध्ये आहेत. सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्ताऱ्याने करण्याचे ब्रीद घेऊन हे बंधू काम करत आहेत.


पाहा व्हिडीओ : सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी! सांगलीतील सलूनची सर्वत्र चर्चा