Sangli Crime : आटपाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे ज्वेलर्सला रविवारी सुट्टी असते याची माहिती घेत आणि रेकी करत चोरट्यांनी हे ज्वेलर्स फोडले.


रोख पावणे सहा लाख रूपये, 21 किलो चांदीचे दागिने, 20 तोळे सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सांगोला आणि आटपाडीतून वाहनांची चोरी करून चोरट्यांनी आटपाडीमध्ये प्रवेश करत ज्वेलर्स फोडले. या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे.


आटपाडीच्या मुख्य पेठेत यपावाडीतील शंकरबापू चव्हाण यांच्या मालकीचे ओम गणेश ज्वेलर्स आहे. ज्वेलर्सला रविवारी सुट्टी असते याची माहिती घेती रेकी करत चोटय़ांनी ज्वेलर्सचे शटर, भारीभक्कम लॉक तोडून चोरट्यांनी ज्वेलर्समधून सात किलो वजनाचे झुम, पैंजण, साडेसहा किलो वजनाचे लहान पैंजण, तीन किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती, करंड, ताट, ग्लास, साडेचार किलो वजनाचे आगरा पायल, सोन्याच्या दागिन्यांचे मोड आणि 5 लाख 75 रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 


दुकानाच्या वरील बाजूस रहायला असलेल्या दस्तगीर शेख यांच्या पत्नीने खाली चोरटय़ांच्या हालचाली पाहून आरडाओरडा केला. हे पाहून चोरट्यांनी चारचाकी गाडीतून सुमारे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास पोबारा केला. त्यानंतर दस्तगीर शेख यांनी घटनेची माहिती सोमवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमार शंकरबापू चव्हाण यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जलद धाव घेतली असता चोरट्यांनी शटर खुल ठेवून दागिने, रोकड घेवून पोबारा केल्याचे स्पष्ट झाले.


चोरट्यांनी ज्वेलर्समधील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराही फोडला आहे. आटपाडी पोलिसांनी पहाटेपासूनच चोरट्यांचा मागोवा घेण्यास सुरूवात केली. ठसेतज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यांनी ज्वेलर्समधील ठसे घेतले. चोरट्यांच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी विविध सीसीटीव्हीचा आधार घेतला.


चोरट्यांनी सांगोला तालुक्यातील वाकी येथून एक डमडम चोरून आटपाडी- मुलाणी येथेपर्यंत प्रवास केला आहे. हे डमडम येथेच सोडून तेथून जावेद मुलाणी यांची इको गाडी चोरून ज्वेलर्समधील चोरीसाठी त्याचा वापर केला. आटपाडीतून चोरी करून पळालेल्या चोरट्यांनी पुन्हा ही गाडी बामणी (ता. सांगोला) येथे सोडली आहे. त्यामुळे हे चोरटे सोलापूर जिल्ह्यातून  आले व पुन्हा त्याच जिल्ह्यात पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे.