सांगली : शेतीमालाचा दर, पुणतांब्यामधील शेतकऱ्यांचं आंदोलन यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने  शेतकऱ्यांवर अन्याय केला आणि राज्य सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. तसंच पुणतांब्यामधील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं. ते सांगलीमध्ये बोलत होते.
 
'केंद्र सरकारने  शेतकऱ्यांवर अन्याय केला; राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं'
आता सगळ्या आघाडी असो किंवा युती या सगळ्यांपासून आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.  रासायनिक खताच्या किंमती गगनाला भिडल्या. डिझेल प्रचंड वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यागत जमा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकाकीपणे आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढत आहोत, असं राजू शेट्टी म्हणाले.


'पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होणार नाही'
तर पुणतांब्यामध्ये उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पूर्ण होतील का यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, "शेती आणि शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न हे केंद्र सरकारच्याच धोरणांमध्ये लपलेले आहेत. राज्य सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग फार कमी आहे. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेतीमालाच्या दरामध्ये लपलेली आहेत आणि शेतीमालाचा दर हा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो. त्यामुळे पुणतांब्यामधील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनामधून फार काही निष्पन्न होईल असं वाटत नाही."


सगळ्याच पक्षांपासून स्वाभिमानी आता चार हात लांब राहणार : राजू शेट्टी
दुर्दैवाने आज संपूर्ण देशामध्ये झुंडशाही चालली आहे. गलिच्छ राजकारण सध्या देशामध्ये चालू आहे. हे पाहून आज आमच्या मनाला वेदना होतात. कुणीही कुठल्याही जातीचा असो त्याला या देशांमध्ये मोकळेपणाने राहता आलं पाहिजे. मोकळेपणाने श्वास घेता आला पाहिजे. मग काश्मीरमधला पंडित असो किंवा अगदी महाराष्ट्रातला अल्पसंख्यांक असो त्याला मोकळेपणाने राहता आला पाहिजे, संविधानाने तसा अधिकारच दिला आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. स्वभिमानी शेतकरी संघटनेने आता सगळ्याच पक्षापासून चार हात लांब राहायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचे जनमत पुन्हा  मिळवू, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.


इतर बातम्या