Raju Shetti : देशातील सर्व पिकांना किमान हमीभावाची मागणी जोर धरत आहे. देशातील विविध संघटनांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी देशातील 200 हून अधिक शेतकरी संघटनांचे दिल्लीत तीन दिवसांचे अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन 6, 7 आणि 8 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली आहे. याबाबत दिल्लीत अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग यांच्या निवासस्थानी देशातील प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. 

Continues below advertisement


देशातील शेतकऱ्यांची लुबाडणूक


देशातील शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी 2017 पासून देशातील संघटना आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारकडून देशातील 23 पिकांना हमीभाव दिला जात आहे. मात्र, हमीभावाचा कायदा नसल्याने 23 पिकांना हमीभाव असूनही  हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करुन देशातील शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला. यामुळं हमीभावाचा कायद्याच्या मागणीला काश्मीर पासून ते कन्याकुमारी व गुजरात पासून ते आसाम पर्यंतच्या सर्व शेतकरी संघटना एकत्रित झाल्या आहेत. केंद्र सरकार  हमीभाव कायद्याच्या गोष्टीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन  देशातील शेतकरी संघटनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेट्टींनी केला. 


देशपातळीवरील आंदोलनाची घोषणा होणार 


दिल्लीच्या जंतरमंतर व सीमेवर झालेल्या आंदोलनानंतर पुन्हा देशातील शेतकरी या कायद्यासाठी आक्रमक होणार असून तीन दिवसांच्या या अधिवेशनात पुढील देशपातळीवरील आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे. शेतक-यांच्याबाबत कळवळा दाखवणाऱ्या  केंद्र सरकारकडे 2018 मध्ये लोकसभेत किमान हमीभावाचा कायदा सादर करण्यात आला असून केंद्र सरकार गेल्या दोन वर्षापासून या कायद्याला केराची टोपली दाखवली आहे. या बैठकीस समन्वयक व्ही. एम. सिंग, जलपुरुष राजेंद्रसिंग , छत्तीसगडचे राजाराम त्रिपाठी , काश्मिर बारामुल्लाचे मा. आमदार यावर मीर , रामपाल जाट ,आदित्य चौधरी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.