Sangli News : जातिवंत माणदेशी खिलार खोंडास पहिल्यापासूनच बाजारात जास्त मागणी आहे. बैलगाडी शर्यती सुरू झाल्यापासून, तर खोंड सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या खोंडांना अधिकच अच्छे दिन आलेत. याचाच प्रत्यय आटपाडीमध्ये विक्री झालेल्या एका खिलारी खोंडाच्या विक्रीच्या किंमतीमधून दिसून आला.


आटपाडीमध्ये चारचाकी गाडीच्या किंमतीला खोंड विकला गेला आहे. जातिवंत माणदेशी खिलार खोंडास 5 लाख 11 हजार रुपये किंमत मिळाल्याने माणदेशी खिलार खोंड चर्चेत आला आहे. खिलार गाईच्या खोंडाला 5 लाख 11 हजार आल्याने आटपाडी तालुक्यासह संपूर्ण माणदेशात आश्चर्ययुक्त समाधान व्यक्त होत आहे. संताजी जाधव यांचा हा 26 महिन्यांचा खोंड असून तो विटा येथील प्रणव हरुगडे यांनी विक्रमी किंमतीस विकत घेतला.


विक्रमी किंमतीच्या या व्यवहारामने माणदेशातील शेतकऱ्यांना खिलार जनावरांच्या संगोपनास प्रोत्साहन मिळणार आहे. प्रसिद्ध कवी, शाहीर दिवंगत जयंत जाधव यांचे लहान बंधू संताजी जाधव यांनी खिलार जनावरांच्या संगोपनाची आवड जपली आहे. तीन खिलार गायी, कालवड, तीन म्हशी, खोड अशा आठ जनावरांचा गोठा असलेल्या संताजी यांनी नेहमीच जनावरांवर पोटच्या मुलांसारखे प्रेम केले आहे. 


त्यांच्याकडील जातिवंत, चपळ व देखण्या जनावरांना यापूर्वी मोठी किंमत मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी पुण्याच्या नितीन आबा शेवाळे यांना 3 लाख 41 हजार रुपयांना खोंड विकला होता. त्यापूर्वी कर्नाटकातील मनाल कलगी गावच्या पशुपालकास 2 लाख 21 हजारांना खोंड विकला गेला होता. आता विट्यातील प्रवण शिवाजीराव हारगुडे यांनी त्यांचा 26 महिन्याचा खोंड 5 लाख 11 हजार रुपये मोजून खरेदी केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या