Sangli News: वारंवार पातळी सोडून राजकारणाचा स्तर रसातळाला नेण्यात मोलाचा वाटा उचलत असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विकृत पातळीवरील टीकेनंतर आज (20 सप्टेंबर) ईश्वरपूर (इस्लामपूर) आणि आष्टा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. इस्लामपूर शहरातील नागरिक व्यापाऱ्यांनी बंद पाळला. तसेच पेठ-सांगली रोडवर रास्ता रोकोही करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोप
दरम्यान, काल सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच वाचाळवीर आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून करण्यात येत आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते सोमवारी सांगलीत येणार आहेत. असे असले तरी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगलीत तीन दिवसांपासून पडसाद उमटत असून आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्व दुकाने बंद ठेवून व्यवहार देखील बंद ठेवण्यात आले.
ईश्वरपूरमध्ये पोलीस आणि जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
दुसरीकडे, गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. परंतु, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. रस्त्यावर टायर पेटवत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. परंतु, रास्ता रोको आंदोलनामुळे पेठ ते सांगली महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जयंत पाटील यांचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.
पडळकर समर्थकांकडून पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक
एकीकडे जयंत पाटील यांच्या समर्थनात आणि गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ ईश्वरपूरमध्ये आंदोलने होत आहे. दुसरीकडे सांगलीत राम मंदिर चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पडळकर यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला. यावेळी पडळकर यांच्या समर्थकानी पडळकर यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली.
इतर महत्वाच्या बातम्या