Sangli Municipal corporation : सांगली शहरासह मिरजेतील ड्रेनेज, पाणी, खराब रस्त्यांवरून सांगली महापालिकेची सभा चांगलीच वादळी झाली. राष्ट्रवादीचे महापौर आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्येच हमरीतुमरी झाली. मिरजमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सभागृहात चपलांचा हार दाखवला, तर सभागृहाबाहेर पोलिस का बोलावले? म्हणून राजदंड उचलत जाब विचारला. यामुळे सभा चांगलीच वादळी ठरली.


महासभेत आज महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नावरून चांगलीच खडाजंगी झाली. मिरजेतील ड्रेनेज आणि पाणी प्रश्नावर सभा आणखी तापली. यावेळी नागरिकांचे प्रश्न मांडणाऱ्या नगरसेवकाचा आवाज दाबावा यासाठी सभागृहाबाहेर पोलिस बोलावले, असा आरोप करत राष्ट्रवादीचे महापौर असताना राष्ट्रवादी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापौरांवर आरोप केला. यावेळी सभागृहात पीठासनावर असणारा राजदंड उचलला आणि एकच गोंधळ उडाला. 


यावेळी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पीठासनावार जाऊन महापौरांना जाब विचारला. यावेळी नगरसेवकांना पोलिसांची भीती का दाखवता? असे म्हणत महापौरांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मिरजेतील ड्रेनेज कामाच्या प्रलंबित विषयावरून नागरिकांनी नगरसेवकांच्या फोटोंना चपलांचा हार घातल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक थोरात यांनी चक्क चपलांचा हारच सभागृहात आणून ते सभागृह आणि महापौरांना दाखवत हा हार कोणाला घालायचा असा प्रश्न उपस्थित केला. यावेळीही मोठा गोंधळ निर्माण झाला. 


महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि जेष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा पाडला. मात्र तब्बल दोन तास हा वादंग सुरू होता. त्यामुळे सभा चांगलीच वादळी ठरली.


इतर महत्वाच्या बातम्या