सांगली : सांगलीसह (Sangli Water Crisis) कृष्णाकाठच्या गावांसाठी हक्काचे पाणी सोडण्यास विलंब करणार्‍या सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचे नावे कोयनेचा सातबारा नसून पाण्यासाठी सांगली जिल्ह्यास (Sangli) वेठीस धरणार्‍या प्रवृत्तीचा आपण निषेध करतो. जिल्ह्याच्या अस्मितेसाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामाही देण्याची आपली तयारी असल्याचे खा. संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत सांगितले.


पाण्यावर नियंत्रण थेट जलसंपदा मंत्री यांचेच असावे


कृष्णा नदी या हंगामात तीन वेळा कोरडी पडली. यामागे सातारचे पालकमंत्री देसाई यांचाच हात असल्याचे स्पष्ट होत असून अधिकार्‍यांवर दबाव आणून कोयनेतून पाण्याचा विसर्ग करण्यात अडथळे आणले जात आहेत. सांगली जिल्ह्याला प्रकल्प अहवालानुसार पाणी मिळावे हीच आमची भूमिका आहे. जिल्ह्याला प्रकल्प अहवालानुसार 35 टीएमसी पाणी आहे. तेच पाणी देण्यास आडकाठी आणली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात येईल आणि पाण्यावर नियंत्रण थेट जलसंपदा मंत्री यांचेच असावे अशी आमची भूमिका आहे.


आम्ही भीक अथवा दान मागत नाही तर आमच्या हक्काचे पाणी मागतो


कोयनेचे पाणी नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले होते. यावर सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, सोलापूरचे चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. मात्र, सातारचे पालकमंत्री देसाई यांनी स्वाक्षरी केली नाही. कोयना धरण कोणा एकाच्या मालकीचे नाही. आम्ही भीक अथवा दान मागत नाही तर आमच्या हक्काचे पाणी मागतो आहे. नियोजनाप्रमाणे हे पाणी सोडण्यात यावे. यावर ताकारी, टेंभू, सिंचन योजनेवरील लाखो शेतकरी आणि गावे पाण्यासाठी अवलंबून असताना या पाण्याचे राजकारण करण्याचे प्रयत्न होत असून याचा आपण निषेध करतो. याबाबत आपण उपमुख्यमंत्री फडणवीस व केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे.


कालवा सल्लागार समितीच्या नियोजनाप्रमाणे हे पाणी सोडण्यात यावे अशी आपली आग्रही भूमिका असून यामध्ये जर नजीकच्या काळात सुधारणा झाली नाही तर खासदारकीचा राजीनामा देण्याची आपली तयारी आहे. राज्यात आम्ही सरकारमध्ये एकत्र असलो तरी सांगली जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर पाणी सोडण्याची आपली तयारी नाही. आमदार अनिल बाबर यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्यानंतर महिन्याला पाच टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगत असले तरी ही वेळच का आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


इतर महत्वाच्या बातम्या