Sangli Rain Update: सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात कालपासून संततधार पाऊस सुरु आहे. मात्र पूर्व भागात अद्याप कोरडाच असून जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जत तालुक्याला पाणी देण्यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करण्यात आले असून 12 पंपाद्वारे पाणी उपसा करुन तो जतमधील पाणी नसलेल्या भागात नेण्यात येणार आहे.


कृष्णा नदीची पाणी पातळी 7 फुटांच्या आसपास स्थिर


दुसरीकडे, कोयना, वारणा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या तरी कोयना धरणातून कृष्णा विसर्ग सुरु नसल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी 7 फुटांच्या आसपास स्थिर आहे. मात्र जर कोयना धरणात मुसळधार पाऊस वाढला आणि कोयनेतून विसर्ग सुरु केला तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.   


कोकरुड येथील बंधारा पाण्याखाली गेला


वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. वारणा धरण क्षेत्रात 29 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात सध्या 15.95 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, शिराळा तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसाने कोकरुड बंधारा पाण्याखाली गेला आहे. शिराळा तालुक्याची पाणीपातळी देखील वाढू लागली आहे. वारणा नदीची पाणीपातळी वाढून कोकरुड येथील बंधारा पाण्याखाली गेला. वारणेच्या पाणलोट क्षेत्रासह वाहतूक ठप्प झाली आहे. शाहूवाडी परिसरात सोमवारी रात्रीपासून तालुक्याच्या पश्चिम भागातील संततधार पाऊस सुरु आहे. सकाळपासून जोर वाढल्याने कोकरुडला येण्यासाठी ओढे, तुरुकवाडीमार्गे पाच-सहा किलोमीटर दूरचा प्रवास करावा लागत आहे.


जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करा


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीत जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी या मागणीसाठी जत शहरामध्ये सत्ताधारी भाजपसह मित्रपक्षांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या आणि शेतीसाठी आता ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या