Kolhapur Weather Update: हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोसमी पावसाने आगमन केल्यापासून अपेक्षित वेग पकडलेला नाही. हवामान विभागाने मागील आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवूनही कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस झाला नव्हता.  






दिलासादायक म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात काहीसा जोर पकडला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाला. कोल्हापुरात मोसमात दुसऱ्यांदा राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. पोलिसांनी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 4 बंधारे पाण्याखाली आहेत. सध्या राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पातळी 16 फुट 10 इंचांवर आहे. मान्सूनला सुरुवात झाल्यापासून काही दिवसांचा अपवाद सोडल्यास दमदार पाऊस पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र ऊन-पावसाचा पाठशिवणीचाच खेळ सुरू आहे. 


कोल्हापूर शहरात गेल्यावर्षी 15 जुलैपर्यंत 457 मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र अवघ्या 141 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यामधील तलावामध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्याचा अपवाद वगळल्यास कोल्हापूर शहर आणि आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेतही पाऊस झालेला नाही.


एनडीआरएफची तुकडी कोल्हापुरात दाखल


दरम्यान, कोल्हापूरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले, तरी एनडीआरएफची 21 जणांची तुकडी दाखल झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. कोल्हापुरात पावसाचे प्रमाण वाढेल किंवा पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती घेतली.निरीक्षक जालिंदर फुंदे आणि पुरुषोत्तम सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. 31ऑगस्टपर्यंत हे पथक जिल्ह्यात असेल. एका पथकाकडे तीन बोटी, तसेच लाइफ जॅकेट आणि लाईफ रिंग अशी साधन सामग्री उपलब्ध असणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या