Sangli Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सांगली ( Sangli) जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. कृष्णा नदीच्या पाणी पातळी काल 23 फुटांवर होती. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर गेली आहे. मात्र, अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग केल्यानं सांगलीला दिलासा मिळाला आहे.
सांगलीत आयर्विन पुलाच्या जवळ 23 फुटावर असलेली कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने न वाढता ती हळूहळू वाढताना दिसत आहे. काल सकाळी 23 फुटांवर गेलेली पातळी आज सकाळी केवळ 4 फुटाने वाढली आहे. ती सध्या 27 फुटांवर गेली आहे. अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेकने विसर्ग केल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत होती. नदीकाठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. असे असले तरी
कोयना धरण पायथा विद्युत गृहातून दुपारी 2 हजार 100 क्युसेक्सने विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. यामुळे संध्याकाळपासून काही प्रमाणात कृष्णेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडं वारणा धरणातून 9 हजार 400 क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी सांगलीच्या वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील एक पूल आणि 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: