Almatti Dam : अलमट्टी धरणातून दोन  लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. काल रात्रीपासून पाण्याचा विसर्ग दोन लाखांवर नेण्यात आला. अलमट्टी धरण 95 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे कृष्णा नदीवरील हिप्परगी (ता. जमखंडी, जि. बागलकोट) येथील धरणाची सर्व दारे खुले करून सर्व पाणी अलमट्टी धरणाकडे सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. 


पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग


अलमट्टी धरणातून काल दुपारी दीड लाखांवरून पावणे दोन लाख करण्यात आला होता. त्यानंतर संध्याकाळी नऊनंतर पुन्हा विसर्ग वाढवून तो दोन लाखांवर नेण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याचे बोलले जाते. धरणाची पाणी क्षमता 123 टीएमसी असून आता धरणात 117 टीएमसी पाणीसाठा आहे. 


कोयना धरणात गेल्या 24 तासात 4.97 टीएमसी पाण्याची वाढ


कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने गेल्या 24 तासात तब्बल 4.97 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही  24.80 टीएमसी पाण्याची गरज आहे. या आठवड्यात कोयना धरण पावसाचा जोर कायम राहिल्यास भरण्याची शक्यता आहे. धरणात सध्या 60 हजार 117 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, कोयना धरणातून विसर्ग सुरु करण्यात आलेला नाही. 


तथापि, कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरण भरल्यानंतर कृष्णेच्या पात्रात विसर्ग सुरु होईल. त्यामुळे अलमट्टीमधील पाण्याची आवक आणि विसर्ग यामध्ये समन्वय ठेवल्यास पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल, यात शंका नाही. 


गेल्या दोन दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडले आहे.  जुलैच्या मध्यावधीनंतर पावसाने उसंत दिल्याने उन्हाळ्याप्रमाणे कडकडीत ऊन पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या