Sangli News: सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यामधील बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारल्या जात असलेल्या कमानीचे खांब पाडल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंचासह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. हे गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ बेडगसह मिरज तालुक्यातील पूर्व भागातील 15 गावांनी कडकडीत बंद पाळत आज (24 जुलै) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोणतीही चौकशी न करता शासनाने गुन्हे दाखल केल्याने प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला.
ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आल्याने बेडग पंचक्रोशीतील गावांनी आंदोलन सुरू केलं आहे. 15 हून अधिक गावांनी गाव कडकडीत बंद पाळत सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत गाव बंद ठेवण्यात येतील, आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मिरज तालुक्यातील बेडगमधील स्वागत कमानीचे खांब पाडकाम प्रकरणाचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. कमानीचे खांब पाडल्या प्रकरणी गाव सोडून निघालेल्या दलित बांधवांच्या लाँग मार्चनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सरपंच उपसरपंचांसह तिघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
सरकारी खर्चात बेडगची स्वागत कमान बांधू
गाव सोडून मुंबईकडे प्रस्थान केलेल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. सरकारी खर्चातून कमान बांधून देऊ तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना दिले. त्यानुसार सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले. या आदेशानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रकरणाची सखोल चौकशी करावी
गावात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद नाही, कायदेशीररीत्या अतिक्रमण असलेले बांधकाम पाडण्यात आले, पण गावची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न बाहेरच्या व्यक्तींकडून सुरू असल्याचा आरोप करत, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून गावाची बदनामी थांबवून संबंधित व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी, अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा बेडग ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या