Sangli News: कोयना धरणातून सोडलेले पाणी अखेर सांगलीजवळील (Sangli News) कृष्णा नदी पात्रात (Krishna river) पोहोचलं आहे. त्यामुळे सांगली, कुपवाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. किमान आठवडाभर पुरेल इतका तरी पाणीसाठा नदीपात्रात असल्याने पिण्याच्या पाण्याची तरी चिंता आता तात्पुरती मिटली आहे. तरीही महापालिकेने पाणी कपातीचे धोरण कायम ठेवले आहे. गेल्या आठ दिवसांपासून कृष्णा नदीतील पाणीपातळी खालावली होती. पावसाने ओढ दिल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते.


सध्या नदीपात्रात किमान आठवडाभर पुरेल इतका पाणीसाठा


जलसंपदा विभागाने शेती व औद्योगिक वसाहतींना पाणी उपसाबंदी लागू केली होती. कोयना धरणातून 1050 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे, पण हे पाणी सांगलीपर्यंत न पोहोचल्याने चिंता वाढली होती. महापालिकेने पाणी कपातीला सुरुवात केली होती. दोनदा पाणी देणाऱ्या भागात सध्या दिवसातून एकदाच पाणी दिले जात आहे. कुपवाड औद्योगिक महामंडळाला पाणी उपसा लागू केला. सध्या नदीपात्रात किमान आठवडाभर पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या तरी सांगली, कुपवाडकरांची चिंता मिटली आहे. पावसाने आणखी ओढ दिली, तर मात्र पाणी टंचाईचे सावट कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.


उपसाबंदीचा कालावधी वाढला


दुसरीकडे, कृष्णेची पाणी पातळी खालावत चालल्याने पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी करण्यात आली होती. कृष्णा नदीमधून शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर आजपर्यंत म्हणजेच 19 जूनपर्यंत उपसा बंदी लागू करण्यात आली होती. पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या योजना मात्र सुरु आहेत. पहिल्यांदा 14 जून ते 17 जूनपर्यंत उपसाबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, चार दिवसांची उपसाबंदी करुनही सांगलीलगतच्या पात्रात पाणी न पोहोचल्याने उपसाबंदीचा आदेश वाढवण्यात आला होता. आता आजपासून ते 22 जून असा उपसा कालावधी असणार आहे. 


कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा


दुसरीकडे, कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास कोयनेतील पाण्याचे जपूनच नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या 1 हजार 50 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्याचा थेट परिणाम सांगली-मिरज शहरावर होत आहे. त्यामुळे सांगली महापालिकेकडूनही पाण्याचे नियोजन सुरु आहे. संपूर्ण जून महिन्यात पाणी अत्यंत जपून वापरण्याचे पाटबंधारे विभागाचे धोरण आहे. चांदोली धरणात 12 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.


इतर महत्वाच्या बातम्या