Sangli News: कृष्णा नदीत पाणी काही प्रमाणात वाढताच पुन्हा मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचा प्रकार घडला आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर जवळील कृष्णा नदी पात्रात हे मळीमिश्रीत पाणी मिसळलेले दिसून आले. यामुळे नदीच्या काठावर फेस जमा झाला आहे. 


काही कारखानदारांनी नदीत वाहते पाणी सुरु होताच मळी नदीपात्रात सोडलेली दिसून येते. मात्र, सध्या नदीत माशांची संख्या कमी आहे, त्यामुळे नदीत मळीमिश्रित पाणी सोडल्याने मासे जरी मेले नसले तरी मात्र या दूषित पाण्यामुळे सांगली, मिरजेसह कृष्णाकाठच्या अनेक गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरवर्षी कृष्णा नदीला पहिले पाणी आले की काही कारखान्याकडून मळीमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. काही महिन्यांपूर्वी मळीमिश्रित पाणी सोडल्याने अंकली जवळील नदीकाठी मृत माशांचा खच लागला होता. आता पुन्हा मळीमिश्रीत पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीत केल्या जाणाऱ्या या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा समोर आला असून अशा पध्दतीने नदीत मळीमिश्रीत पाणी सोडणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


जानेवारीत कोल्हापूर ते शिरोळपर्यंत पडला होता माशांचा खच


दरम्यान, जानेवारी महिन्यात कोल्हापूर शहरापासून ते पार शिरोळपर्यंत मृत माशांचा खच पडला होता. पोकळ आश्वासने, प्रदुषणमुक्तीची गुलाबी स्वप्ने, कारखान्यांकडून सांडपाणी थेट पाण्यात सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यात अक्षरश: विष तयार होत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचा अंश कमी होत चालल्याने लाखो मासे तडफडून मृत्यूमुखी पडले होते. कोल्हापूर जिल्ह्यात तेरवाड बंधाऱ्याजवळ लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगावमध्येही कृष्णा नदीपात्रात रासायनिक मळीचे पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या