Kolhapur News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चाचपणी सुरु करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले खासदार धैर्यशील माने यांनी बंडखोरी केल्याने ठाकरे गटाकडून आता कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगलीमध्ये लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मंगळवारी (11 जुलै) मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. 


दुसरीकडे, शनिवारी कोल्हापुरात पक्षातील पदाधिकाऱ्यांसह माजी आमदारांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उसना उमेदवार कोणत्याही परिस्थितीत न घेता शिवसैनिकालाच उमेदवारी द्या, असा आग्रह संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे धरला. त्याच पद्धतीने अहवाल सादर करावा, अशी मागणी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यातून केली. त्यामुळे या अहवालाच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर ठाणे, छत्रपती संभाजीनगरनंतर सर्वाधिक पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले होते. पक्षाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटाच्या गळाला लागले. यानंतर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर सुद्धा शिंदे गटात आहेत. त्याचबरोबर माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके सुद्धा शिंदे गटात गेल्याने कोल्हापुरात ठाकरेंच्या पक्षात फक्त पदाधिकारी आणि माजी आमदार राहिले आहेत.  यामुळे ठाकरे गटाची ताकद क्षीण होऊन गेली आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणेंविरोधात कुरबुरी मातोश्रीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी कायम राहिल्यास ही जागा ठाकरे गटाला मिळणार की काँग्रेसचा दावा मान्य होणार? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 


उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येणार 


या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 15 जुलैनंतर कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 15 ते 27 जुलै दरम्यान त्यांचा दौरा निश्चित होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात त्यांची जाहीर सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा अंदाज घेऊन हा कार्यक्रम मोठ्या हाॅलमध्ये घेतला जाईल, अशीही शक्यता आहे. याबाबत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी माहिती दिली आहे. 


शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे


दरम्यान, शनिवारी संपर्क मेळाव्यात बोलताना संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले की, लोकसभेसाठी उमेदवारी मागताना आपल्या पायाखाली किती थर मजबूत आहेत, हेसुद्धा पाहिलं पाहिजे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर न मांडता ते 'मातोश्री'च्या दारात सोडवले गेले पाहिजेत. माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की, मतदार संधीची वाट पाहत आहेत. स्वाभिमानाने जनतेसमोर जायचे आहे. निष्ठावंत शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा संदेश मातोश्रीवर देण्यात यावा. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी लोकसभेसाठी जो उमेदवार द्याल, त्याला शाहूवाडी, आंबा परिसरातून मताधिक्य देऊ, अशी ग्वाही दिली. माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी सुरुवातीला शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. भाजपची ही रणनीती मतदारांसमोर आणली पाहिजे, असे आवाहन केले. 


इतर महत्वाच्या बातम्या