Sangli News: अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावल्यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी याचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा गवताचा भारा विस्कटण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. या पेंड्या दाही दिशेला झाल्या आहेत आणि या पेंड्याच्या आता काड्या होतील आणि काड्यानंतर मोडल्या जातील, अशी टीका केली. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी पातळी सोडून टीका केली.
पुन्हा नवे सरदार बनवू नये यासाठी लढाई लढावी लागेल : सदाभाऊ खोत
शरद पवारांना त्यांचे पाप सध्या फेडावे लागत आहे, पवारांवर नियतीने, काळाने मोठा सूड उगवला आहे. ते पुन्हा गावगाड्यात येऊ नये आणि पुन्हा नवे सरदार बनवू नये यासाठी लढाई लढावी लागेल, असेही सदाभाऊ खोत म्हणाले. पुतण्यापासून मला वाचवा अशी नवीन हाक आता महाराष्ट्रला ऐकू येत आहे, आतापर्यंत पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू येत होती, असेही ते म्हणाले.
पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक पाहण्याची वेळ आली
महाराष्ट्रातील राजकारण प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे जात आहे. शरद पवारांचे राजकारणात आगमन झाल्यानंतर 1980 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वाडे विरुद्ध गावगाडे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष सुरु झाला. सरंजामशाही सुरु झाली. शरद पवारांनी सरदारांना सोबत ठेवून राजकारण केले. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची खळी लुटली. शरद पवारांना गावगाड्यांकडे धावत येऊन मला वाचवा, असं म्हणायची वेळ आली आहे. पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक याची देही याचि डोळा पवारांकडे आली आहे. शरद पवारांना त्यांचे पाप फेडावे लागत असल्याचे सदाभाऊ म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बोलतानाही सदाभाऊ खोत यांनी भाजपची पाठराखण केली होती. भाजपसोबत गेलेल्या पक्षांना भाजपच संपवत असल्याचे बोलले जाते, याविषयी तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, कुणीही कुणाला संपवत नाही. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण विरोधकांनी भाजपच्या बाबतीत असा अपप्रचार करुन ठेवल्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. यापूर्वी राज्यात कुठलेही सरकार असले तरी अंमल मात्र बारामतीचा होत होता. राष्ट्रवादीचा अश्वमेध फडवणवीसांनी रोखल्याचेही म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या :