सांगली : मिरज तालुक्यातील बेडगमध्ये स्वागत कमान पाडकामाचा वाद अजूनही शमलेला नाही. या वादावर तोडगा काढण्यासाठी बेडगमधून जाणाऱ्या मिरज ते आरग या जिल्हा मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान बांधण्यास राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानेही हिरवा कंदील दाखवला आहे. या कमानीला येणारा खर्चही शासन करणार आहे. मात्र, प्रशासनाच्या या प्रस्तावावर आंदोलकांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता श्याम कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत बेडग येथील जिल्हा मार्ग रस्त्यावर स्वागत कमान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.


दुसरीकडे, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी सातारमध्ये आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा मार्गावर स्वागत कमानीचा प्रस्ताव आंदोलकांकडे दिला. या प्रस्तावावर डॉ. महेशकुमार कांबळे यांनी अन्य आंदोलकांशी चर्चा करून सांगण्याचे आश्वासन दिले. तसेच अन्य मागण्याबाबत निर्णय घेण्याची मागणीही डॉ. कांबळे यांनी केली आहे.


आंदोलकांशी चर्चा करून निर्णय 


बेडगमधील स्वागत कमान ग्रामपंचायत प्रशासनाकडून अनधिकृत ठरवून पाडण्यात आली होती. याप्रकरणी समस्त आंबेडकरी समाजाचा मुंबईपर्यंत लाँग मार्च चालू आहे. सध्या सातारा जिल्ह्यात आम्ही आलो असून सातारा जिल्हा प्रशासनाने आमची भेट घेऊन चर्चा करून स्वागत कमान बांधण्याचे आश्वासन दिले आहे. पण, अन्य दोन मागण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे आंदोलकांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहे, अशी माहिती आंदोलक डॉ. महेशकुमार कांबळे यांनी दिली.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत कमान


दरम्यान, बेडगमध्ये स्वागत कमान बांधण्याऐवजी अभ्यासिका करण्याचा ग्रामसभेने निर्णय घेतला होता. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत डॉ. आंबेडकर स्वागत कमान बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामसभेचा ठराव डावलण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे.


बेडगच्या 7 जणांची प्रकृती बिघडली


मुंबईकडे लाँग मार्च करणाऱ्या आंदोलकांमधील 7 जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच सांगली जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सरकारी रुग्णालयात भेट देत आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी केली. माणगावमधून सुरु झालेल्या लाँग मार्चला 12 दिवस झाले आहेत. यामध्ये एक वर्षापासून 95 वर्षांपर्यंतचे ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या